अमरावती Nitesh Rane Facebook Live Offensive Comments : अमरावती जिल्ह्यातील अति संवेदनशील अशा अचलपूर शहरात आमदार नितेश राणे यांनी रविवारी (29 सप्टेंबर) सायंकाळी बाईक रॅली काढली. सकल हिंदू समाज आणि शक्ती फाउंडेशनच्या वतीनं काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीचं फेसबुक लाईव्ह करण्यात आलं. मात्र, फेसबुक लाईव्हदरम्यान अनेक युझर्संनी आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या कमेंट्सची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. कमेंट्स करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा : अचलपूर हे शहर अति संवेदनशील असल्यामुळं सकल हिंदू समाज आणि शक्ती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित बाईक रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. रॅलीच्या मार्गामध्ये तुरळक बदल करून शनिवारी रात्री या रॅलीला परवानगी देण्यात आली. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या बाईक रॅलीमध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरात कडकडीत बंद होता. तसंच दोन्ही शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी बाईक रॅली फेसबुकवर लाईव्ह करण्यात आली. मात्र, या रॅलीच्या फेसबुक लाईव्हवर अचलपूर परतवाडा यासह अमरावती जिल्ह्यातील विविध भागातून तसंच राज्यातील इतर जिल्ह्यातून आक्षेपार्ह कमेंट्स काही जणांनी केल्या. अशा प्रकारच्या कमेंट्सकरुन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलाय.
परतवाड्यात गुन्हा दाखल : फेसबुक लाईव्ह दरम्यान आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या अक्षय पारवे विरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती सायबर क्राईम पथकाच्या वतीनं आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय. सुज्ञ नागरिकांनी अशा फेसबुक लाईव्हवर कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह कमेंट्स करू नये. यासह अचलपूर आणि परतवाड्यातील नागरिकांनी आपल्या शहरात शांतता ठेवावी, असं आवाहनदेखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलंय.
हेही वाचा -
- नितेश राणेंच्या 'हिंदू हुंकार दुचाकी' रॅलीला अमरावतीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद - Nitesh Rane Visit Amravati
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय? - Bombay High Court Petition
- नितेश राणे फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू...'या' नेत्याने केला हल्लाबोल - Imtiyaz Jaleel