मुंबई : गुजरातमधील वडोदरा शहरात पार पडलेल्या बैठकीत अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे करार भारत आणि स्पेनमधील पायाभूत सुविधा, आरोग्य, रेल्वे वाहतूक आणि संस्कृती आणि पर्यटनला प्रोत्साहन देण्याच्या संबंधित आहेत. यातील आरोग्य सुविधांमधील कराराचा महाराष्ट्राला फायदा होणार असून, महाराष्ट्रात लवकरच स्पेनचं तंत्रज्ञान असलेल्या रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत येणार आहेत.
महाराष्ट्रात धावणार अद्यावत रुग्णवाहिका : आपल्या देशात असे अनेक भाग आहेत जिथे वाहने जात नाहीत. तर अनेक भागात रुग्णांना, गरोदर महिलांना डोलीमधून नेलं जातं. शहरी भागात खड्डे, वाहतूक कोंडी या समस्यांमध्ये अनेकदा रुग्णवाहिका अडकतात. त्यामुळं योग्य वेळेत उपचार न झाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. अशातच आपल्या देशातील रुग्णवाहिकांमध्ये रुग्णावर तत्काळ उपचार सुरू करता येतील अशा सोयी सुविधा नाहीत. यावरच उपाय म्हणून स्पेन मधील तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या अद्यावत रुग्णवाहिका महाराष्ट्रात धावणार आहेत.
'या' रुग्णवाहिकांचा समावेश : या संदर्भात भारत सरकार आणि स्पेन सरकारमध्ये करार झाला आहे. या रुग्णवाहिकांमध्ये भारत सरकार आणि राज्यातील एका मराठमोळ्या उद्योजकाची संस्था 'सुमित ग्रुप ऑफ एंटरप्राइजेस' गुंतवणूक करणार आहे. या रुग्णवाहिका स्पेनमधील 'SSG' या संस्थेकडून खरेदी केल्या जाणार आहेत. या दोन्ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात सेवा सुविधा देतात. या संदर्भात सुमित ग्रुप ऑफ एंटरप्राईजेसचे व्हाईस चेअरमन सुमित साळुंखे यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली. सुमित साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 1756 अद्यावत रुग्णवाहिका सेवेत आणल्या जाणार असून, यामध्ये एअर ॲम्बुलन्स, वॉटर ॲम्बुलन्स, रोड ॲम्बुलन्स आणि बाईक ॲम्बुलन्स अशा प्रकारच्या रुग्णवाहिकांचा समावेश असणार आहे.
हॉस्पिटल आपल्या दारी : या रुग्णवाहिकांसंदर्भात माहिती देताना सुमित साळुंखे यांनी सांगितलं की, "या रुग्णवाहिकांमुळं महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात मोठे बदल झालेले पाहायला मिळतील. या रुग्णवाहिका सर्व अद्यावत तंत्रज्ञानयुक्त असतील. आत्तापर्यंत आपल्या येथे धावणाऱ्या रुग्णवाहिका या रुग्णाला घरातून रुग्णालयापर्यंत नेत होत्या. मात्र, भविष्यात येणाऱ्या रुग्णवाहिका या 'हॉस्पिटल आपल्या दारी' या धर्तीवर आधारित असतील. साधारण पाच टप्प्यात या रुग्णवाहिका महाराष्ट्रात सुरू झालेल्या पाहायला मिळतील. याचा पहिला टप्पा साधारण मार्च महिन्यामध्ये सुरू होईल".
रुग्णवाहिकांमध्ये सुविधा नसल्यानं होतो रुग्णांचा मृत्यू : एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळणं गरजेचं असतं. याला वैद्यकीय भाषेमध्ये 'गोल्डन अवर' असं म्हणतात. मात्र, अनेकदा रुग्णाला रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झालेला असतो. त्यामुळं रुग्णाच्या आयुष्यातले हे गोल्डन अवर महत्त्वाचे असतात. त्या काळात रुग्णाला योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. मात्र, सध्या आपल्याकडं असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये अशा प्रकारच्या सुविधा नसल्यानं रुग्णांचा मृत्यू होतो. या मृत्यूंची संख्या कमी होण्यास आगामी काळात निश्चितच मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमित साळुंखे यांच्या कंपनीनं एक हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
काय आहे प्रकल्पाला नाव : सुमित साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हा प्रकल्प पुढील दहा वर्षांसाठी असून, या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा 14 हजार कोटी रुपये इतका आहे. यातील 1,600 कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणुकीपैकी, 650 कोटी रुपये हे या प्रकल्प चालवण्यासाठी वापरले जाणार आहेत. तर, 100 कोटी रुपये राज्यभरात 180 आसनी प्रगत आपत्कालीन प्रतिसाद केंद्रे उभारण्यासाठी वापरले जाणार आहेत. या प्रकल्पाला Sumeet SSG असं नाव देण्यात आलं आहे. या प्रकल्पामध्ये पुणेस्थित सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचा 76 टक्के सहभाग असणार आहे. तर, स्पॅनिश फर्म SSG मॅट्रिक्स यांचा 24 टक्के इतका सहभाग असणार आहे. या दोन संस्थांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
हेहा वाचा -