लातूर NEET Paper Leak Case : 'नीट'पेपर फुटी प्रकरणी लातुरात गुन्हा दाखल होताच सहा दिवसांच्या पोलिस तपासानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. पेपर फुटीच्या तपासाचं प्रकरण सीबीआयकडे वर्ग होताच सीबीआयचे दोन वरिष्ठ अधिकारी अत्यंत गोपनीय पद्धतीनं लातूरात शनिवारी मध्यरात्री दाखल झाले. रविवारी दिवसभर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण पार पाडली. लातूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या जलील पठाण, संजय जाधव दोन आरोपींना आज (1 जुलै) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर या दोन्ही आरोपींचा ताबा 'सीबीआय'च्या अधिकाऱ्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्ली येथील फरार आरोपी गंगाधरला सीबीआयनं अटक केल्यानंतर त्याला लातूरात आणलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्याच्याशिवाय सीबीआयचे दोन अधिकाऱ्यांचे पथक लातूरात दाखल झाले आहे. देशातील 'नीट' घोटाळ्याचं लातूर कनेक्शन उघड झाल्यानंतर नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकानं तीन शिक्षकासह दिल्ली येथील गंगाधर विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर एटीएसकडून हा तपास लातूर पोलिसांना देण्यात आला. सध्या अटक करण्यात आलेले जलील पठाण, संजय जाधव हे दोन्ही आरोपी 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. त्यानंतर सीबीआयचे पथक शनिवारी रात्री उशिरा लातुरात धडकले.
सीबीआयकडुन स्वतंत्र तपास केला जाणार : अत्यंत गोपनीय पद्धतीनं सुरू असलेल्या या प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित झाला आहे. सीबीआयकडे प्रकरण जाताच दिल्ली येथील दोन वरिष्ठ अधिकारी शनिवारी मध्यरात्री उशिरा लातुरात दाखल झाले. रविवारी त्यांनी लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी तपास अधिकाऱ्यांकडून आरोपींच्या मोडस ऑपरेंडीची आणि तपासात समोर आलेल्या नव्या बाबींची माहिती घेतली. अत्यंत गोपनीय पद्धतीनं शहरात दाखल झालेल्या या पथकानं आपलं काम सुरू केलं. आता न्यायालयातून आरोपी ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयच्या वतीनं या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यात येणार आहे.
लातूरचे दोन आरोपी संजय जाधव, जलील पठाण हे आरोपी इरान्ना कोंगुलवार याला पैसे पुरवत होते. त्यानंतर इरान्ना दिल्लीतील गंगाधरला पैसे पाठवत होता. त्यामुळं गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, राजस्थानमधील कोण गंगाधरच्या संपर्कात होते? सीबीआयच्या तपासातून पेपर फुटी प्रकरणातील मोठे मासे गळाला लागणार का? हे आता तपासात समोर येणार आहे. सातूर पॅटर्नच्या नावामुळे राज्यभरातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि क्लासेसची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत नीटच्या पेपरफुटीमुळे पालकवर्गाची चिंता वाढली आहे.
हेही वाचा
- दक्षिण कोरियात नोकरीचे आमिष दाखवून मानवी तस्करी, नौदलातील सब लेफ्टनंट निघाला मास्टरमाईंड! - Maharashtra Human Trafficking
- साताऱ्यातील केळवली धबधब्यात पोहताना कराडचा तरूण बुडाला, रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू - Karad youth drowned
- NEET पेपर लिक प्रकरण: महाराष्ट्रात कमी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परराज्यात जास्त मार्क; लातूरच्या 'नीट' तज्ज्ञांचा 'हा' मोठा दावा - NEET Exam Scam