लातूर NEET Exam Scam : 'नीट' घोटाळ्याचे लातूर कनेक्शन उघड झाल्यानंतर नांदेड एटीएसच्या तक्रारीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेचे शिक्षक आरोपी संजय जाधव, जलील पठाण आणि धाराशिवच्या आयटीआयचा सुपरवायझर इरान्ना कोंगुलवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार आहे.
नीट घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग : नीट घोटाळा प्रकरणी लातूर पोलिसांकडून अत्यंत गोपनीय पद्धतीनं तपास सुरू होता. शनिवारी सीबीआयचे पथक लातूरात दाखल झाले. रविवारी सीबीआयच्या पथकाने लातूर पोलिसांकडून माहिती, दस्तऐवज गोळा केला होता. आज (01 जुलै) न्यायालयाने लातूरच्या नीट घोटाळ्याचा तपास सीबीआयकडं रीतसर वर्ग केल्याची ऑर्डर दिली. परंतु आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्यानं, मंगळवारी (2 जुलै) रोजी सीबीआयचे अधिकारी आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर करणार आहेत.
दोघे अद्यापही फरार : नीट घोटाळ्याचा मास्टरमाइंड फरार आरोपी गंगाधर आणि लातूरचा सूत्रधार इरान्ना कोंगुलवार हे अद्यापही फरार आहेत. तर सीबीआयकडं हे प्रकरण वर्ग करण्यात आल्यानंतर दोन्ही फरार आरोपींना अटक केल्यानंतरच याप्रकरणी अजून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
लातूर पॅटर्नमुळं शहरात क्लासेसची संख्या अधिक : लातूरचे दोन आरोपी संजय जाधव, जलील पठाण हे आरोपी इरान्ना कोंगुलवार याला पैसे पुरवत होते. त्यानंतर इरान्ना दिल्लीतील गंगाधरला पैसे पाठवत होता. त्यामुळं गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, राजस्थानमधील कोण गंगाधरच्या संपर्कात होते? सीबीआयच्या तपासातून पेपर फुटी प्रकरणातील मोठे मासे गळाला लागणार का? हे आता तपासात समोर येणार आहे. लातूर पॅटर्नच्या नावामुळं राज्यभरातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि क्लासेसची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत नीटच्या पेपरफुटीमुळे पालकवर्गाची चिंता वाढली आहे.
हेही वाचा -