मुंबई NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळं ही मुदत आज संपत असून, या प्रकरणावर राहुल नार्वेकर निकाल देत आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या निकाल वाचनातील महत्त्वाचे मुद्दे
- शरद पवारांच्या मनाविरुद्ध कृती करणं म्हणजे पक्ष सोडणं नाही, असा निकाल देत विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला मोठा दिलासा दिला.
- अजित पवार गटाचे आमदार अपात्र नाहीत, असा विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
- अजित पवार गटाला 41 आमदारांचा पाठिंबा आहे. 53 पैकी 43 आमदार अजित पवार गटाकडं आहेत. त्यामुळे पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
- शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आव्हान देण्यात आलं नव्हतं. अध्यक्ष पदाच्या दाव्यासाठी दोन्ही गटाकडून पुरावे सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.
- 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडली आहे. तोपर्यंत कोणताही वाद नव्हता. राष्ट्रवादीची कार्यकारिणी समिती महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीच्या समित्यांची बाजू ऐकून घेतली आहे.
- राहुल नार्वेकर हे पाच याचिकांवर निकाल देणार आहेत. त्यात शरद पवार गटाच्या तीन तर अजित पवार गटाच्या दोन याचिका आहेत. मूळ पक्ष कुणाचा हे ठरवावं लागणार आहे. त्यानंतर निकाल देणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे. कोर्टाचे नियम लक्षात घेतले आहेत. तसेचे सेनेचे प्रकरण लक्षात घेतले आहे. पक्ष कोणाचा हे ठरविताना संख्याबळ लक्षात घेण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष दोन निकाल देणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
- पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. पक्षाची घटना लक्षात घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि १० व्या सूचीनुसार निकाल देण्यात येणार आहे. दोन्ही गटांनी आपलाच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत दोन्ही गटांनी म्हणण मांडलं आहे.
15 फेब्रुवारीपर्यंत दिली होती मुदत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. मात्र, अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेत केवळ एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देताना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. न्यायालयानं यापूर्वी राहुल नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते.
निवडणूक आयोगाचा निकाल : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं तब्बल 10 हून अधिक सुनावणी घेतल्या होत्या. त्यानंतर अखेर सहा फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं याबाबत निकाल दिला होता. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालंय. त्यामुळं अजित पवार यांच्याकडंच राष्ट्रवादीची मालकी राहणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेची उद्दिष्टे तपासून हा निर्णय दिलाय. संघटनात्मक बहुमत असल्याच्या शरद पवार गटाच्या दाव्यात गंभीर विसंगती आढळल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय.
- शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात : अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेलाय. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटानंही न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं होतं.
- अजित पवारांसोबत किती खासदार-आमदार? : महाराष्ट्रातील 41 आमदार, नागालँडमधील 7 आमदार, झारखंडमधील 1 आमदार, लोकसभेतील 2 खासदार, महाराष्ट्र विधानपरिषदेतील 5 आमदार, तर राज्यसभेतील 1 खासदार असं संख्याबळ अजित पवार यांच्याकडे आहे.
- शरद पवारांसोबत किती खासदार-आमदार? : महाराष्ट्रातील 15 आमदार, केरळमधील 1 आमदार, लोकसभेतील 4 खासदार, महाराष्ट्र विधानपरिषदेतील 4 आमदार आणि राज्यसभेतील 3 खासदार असं एकूण संख्याबळ सध्या शरद पवार यांच्याकडे आहे.
हेही वाचा -