मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून बांद्रा येथे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, सिद्दीकी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. रविवारी रात्री बाबा सिद्दीकी यांना दफन करण्यात आलं.
शासकीय इतमामात दफनविधी : रविवारी दुपारी बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव त्यांच्या बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अर्पिता खान, उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी अखेरची सलामी दिली व शासकीय इतमामात बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी झाला.
राष्ट्रवादीचे नेते उपस्थित : अंत्यसंस्कारावेळी बडा कब्रस्तानमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेत लाखो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राहत्या घरातून पार्थिव बाहेर काढतावेळी काही वेळ पाऊस देखील पडला होता.
अंत्यदर्शनाला 'व्हीआयपीं'ची रीघ : रविवारी सिद्दीकी यांचा मृतदेह पाली हिल येथील त्यांच्या 'मक्बा हाईटस' या इमारतीत आणण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येनं त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. बाबा सिद्दीकी हे हाय प्रोफाईल इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध होते. विविध पक्षांमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं बॉलिवूड सेलिब्रेटी व राजकारणी व्यक्तींनी हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, बाबा सिद्दीकींचा मित्र अभिनेता सलमान खान, सना खान, मुफ्ती अनस, उर्वशी रौतेला, खासदार सुप्रिया सुळे, एम.सी.स्टॅन, लुलिया वंतूर, शुरा खान, अर्पिता खान, सोहेल खान, राज कुंद्रा, जरीन खान, पूजा भट्ट, जहीर इक्बाल, माजी खासदार प्रिया दत्त यांनी सिद्दीकी यांचं अंत्यदर्शन घेतलं. सिद्दीकी यांचं शवविच्छेदन कूपर रुग्णालयात करण्यात आलं. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, नजीब मुल्ला, कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी भेट देऊन झिशानचे सांत्वन केले.
दिग्गजांनी केलं सांत्वन : शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी वांद्रे पश्चिम येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर रुग्णालयात सिद्दीकी यांचे निकटवर्तीय अभिनेते संजय दत्त, सलमान खान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, माजी खासदार प्रिया दत्त यांनी धाव घेतली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्थानिक आमदार आशिष शेलार, जहीर इक्बाल व इतरांनी भेट दिली व सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली.
पोलिसांनी दिली माहिती : बाबा सिद्दीकी हे शनिवारी रात्री मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या बांद्रा येथील ऑफिसमध्ये होते. ऑफिसमधून ते बाहेर येताच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिली.
वजनदार व्यक्ती : बाबा सिद्दीकी हे गेली तीन ते चार दशकं राजकारणात सक्रिय होते. राजकीय आयुष्यातील बहुतांश काळ ते काँग्रेस पक्षात होते. काही महिन्यांपूर्वीच ते अजित पवारांच्या गटात गेले होते. तसेच, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळं सुद्धा ते चर्चेत असायचे.
हेही वाचा