पुणे Vidhan Parishad Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता पुढील महिन्यात 11 जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षानं मोर्चेबांधणी सुरू केली. अशातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी अजित पवार यांच्याकडं केली. त्यामुळं आता अजित पवार हे कोणाला उमेदवारी देणार हे पाहावं लागणार आहे.
दिपक मानकरांना मिळणार संधी? : विधानपरिषदेचे 11 सदस्य निवृत्त झाले. त्यामुळं विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. विधानसभा सदस्य विधानपरिषदेतील 11 आमदारांची निवड करणार आहेत. त्यासाठी, 25 जूनपासून 2 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर, 5 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 12 जुलै रोजी मतदान होणार असून, 12 जुलै रोजीच निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळं, 12 जुलै रोजी चित्र स्पष्ट होईल. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडीसाठी महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाला 4 जागा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच अजित पवार यांना मिळणाऱ्या जागांपैकी त्यांनी एक जागा पुण्यातील शहराध्यक्ष दिपक मानकर यांना द्यावी, अशी मागणी आता पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांची मागणी : याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणाले की, "लोकसभेत पाहिजे तसे यश आम्हाला मिळालं नाही. पुणे शहर तसेच जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आता अजित पवार यांनी शहराध्यक्ष दिपक मानकर यांचा विचार करावा. गेली 40 वर्ष ते अजित पवार यांच्यामागे उभे असून, त्यांची साथ देत आहेत. आज जो घटक आमच्यापासून दूर गेला आहे, त्याला जवळ आणण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षाने शहराध्यक्ष मानकर यांचा विचार करावा."
दिपक मानकरांनाही इच्छा : याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विचारलं असता ते म्हणाले, "याबाबतची मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच माझी देखील इच्छा आहे की पक्षानं विधानपरिषदेसाठी माझा विचार करावा. गेली ४० वर्ष राजकारणात असून, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मागे आम्ही उभे आहोत. तसेच शहराचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शहर आणि जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षाने संधी द्यावी."