अमरावती : गौरी महालक्ष्मीचं आगमन व पूजन हे भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा विराजमान झाल्यावर होत. परंतु विदर्भात अनेक ठिकाणी अश्विन महिन्यात विशेषत: नवरात्रीच्या पर्वावर गौरी महालक्ष्मीचं आगमन व पूजन केलं जातं. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्याही दिवशी अनेकांच्या घरी तीन दिवसांसाठी गौरी महालक्ष्मीची स्थापना केली जाते.
भाद्रपद महिन्यात अडचण आल्यास अश्विन महिन्यात पूजन : भाद्रपद महिन्यात गौरी महालक्ष्मीचं पूजन मोठ्या प्रमाणात केलं जातं. यादरम्यान जर एखाद्याच्या घरात काही समस्या असेल आणि गौरी महालक्ष्मीची प्रतिष्ठापना होऊ शकली नाही, तर अशी कुटुंबं अश्विन महिन्यात नवरात्र उत्सवादरम्यान गौरी महालक्ष्मीचं आगमन आणि पूजन करतात. मात्र, काही कुटुंबात अश्विन नवरात्रीतच गौरी महालक्ष्मी पूजनाला मान आहे.
मेटकर यांच्या घरी शंभर वर्षांची परंपरा : अमरावती शहरातील सावता कॉलनी परिसरात राहणाऱ्या विश्वास मिटकर यांच्या घरी शंभर वर्षांपासून अश्विन नवरात्रीच्या काळात गौरी महालक्ष्मीची पूजा केली जाते. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबात पारंपरिक गौरी महालक्ष्मी नाही. मेटकर कुटुंब परतवाड्यात राहायचं तेव्हा त्यांच्या शेजारी जोशी कुटुंब होतं. नवरात्रीच्या काळात गौरी महालक्ष्मी जोशींच्या घरी बसायच्या. दरम्यान, जोशी यांच्या कुटुंबात एकच वृद्ध महिला राहिल्यामुळं त्यांनी विश्वास मेटकर यांच्या आईला आमच्या घरची गौरी महालक्ष्मी तुमच्याकडे स्थापन करा. या गौरी महालक्ष्मीची स्थापना केवळ नवरात्रीतच करा, असं जोशी आजीनं सांगितलं. याबाबत विश्वास मेटकर यांची मुलगी सोनल महल्ले हिनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, जोशी यांनी दिलेल्या गौरी महालक्ष्मीची स्थापना आमच्या घरी नवरात्रीच्या काळातच होते.
आंबील, कथलीसह सोळा भाज्यांचा नैवेद्य : गौरी महालक्ष्मीच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी देवीला आंबील, कथलीसह एकूण सोळा भाज्यांचा नैवेद्य दिला जातो. पुरणपोळी, पंचामृत विविध चटण्या या सोबतच वांगी वगळता एकूण 16 भाज्यांचा नैवेद्य गौरी महालक्ष्मीला दाखवला जातो. हाच महाप्रसाद घरी येणाऱ्या भाविकांसाठी देखील असतो, अशी माहिती राहुल मेटकर यांनी दिली. अनेकांकडे गौरी महालक्ष्मीचा प्रसाद हा सायंकाळी असतो. मात्र, ज्या जोशी कुटुंबाकडून मेटकर यांच्याकडे गौरी महालक्ष्मी आल्या ते जोशी कुटुंब सकाळीच महाप्रसाद करायचे, त्यामुळं मेटकर कुंटूब त्यांच्या ओळखीच्या लोकांना सकाळीच महाप्रसादासाठी बोलावतात. यावर्षी महालक्ष्मी दरम्यान 'राधा राणी' ही थीम डोक्यात ठेवून गौरी महालक्ष्मीसाठी खास देखावा तयार केला असल्याचं देखील राहुल बेटकर यांनी सांगितलं.
हेही वाचा
- 100 कोटी वर्षांपूर्वीच्या गुहेत 2 हजार वर्षांपासून केली जातेय 'अंबादेवी'ची पूजा; जाणून घ्या पौराणिक कथा
- 'शितलादेवी'च्या दर्शनाला आल्यास साथरोग होतात बरे; भाविकांची गर्दी, जाणून घ्या आख्यायिका - Shri Shitladevi Mandir
- कोराडीची जगदंबा माता: दिव्य, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेली आदिमाया जगदंबा; जाणून घ्या काय आहे आख्यायिका - Koradi Navratri Festival 2024