अमरावती Railway Wagon Repair Factory : अमरावतीत बडनेरा लगत 2016- 17 मध्ये सुरू झालेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचं काम आता 29 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. तसंच या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यामध्ये आता सुरुवातीच्या टप्प्यात महिन्याला पाच रेल्वे वॅगन दुरुस्ती होत आहे. भविष्यात या ठिकाणी महिन्याला 180 रेल्वे वॅगन दुरुस्ती केली जाणार आहे.
खासदार नवनीत राणांनी घेतला आढावा : बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचा आज (20 फेब्रुवारी) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आढावा घेतला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी 29 फेब्रुवारीपर्यंत रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचं काम पूर्ण होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याला भेट दिली. त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांशी खासदार राणा यांनी संवाद साधला.
- 466 कोटींचा प्रकल्प: 2016-17 मध्ये या प्रकल्पासाठी 299 कोटी रुपये मंजूर झाले होते. कोविडमुळं एक वर्ष या प्रकल्पाचं काम बंद होतं. 2022 मध्ये हा प्रकल्प तयार होणार होता. मात्र, आता 2024 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होत आहे. या प्रकल्पासाठी एकूण 466 कोटी रुपये खर्च लागला आहे.
1900 जणांना मिळणार रोजगार : रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पामध्ये सध्या पहिल्या टप्प्यामध्ये 1100 कर्मचाऱ्यांची गरज आहे. या ठिकाणी महिन्याला 180 रेल्वे वॅगन दुरुस्तीचा टप्पा हा सुमारे अडीच तीन वर्षानंतर गाठला जाणार आहे. त्यामुळं सध्या या ठिकाणी 1100 कामगारांची गरज आहे. अडीच तीन वर्षानंतर जेव्हा 180 रेल्वे वॅगन दुरुस्तीचं लक्ष्य पूर्ण होईल. त्यावेळी 1900 कामगारांची गरज या रेल्वे वॅगन कारखान्यामध्ये भासणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांना दिली.
स्थानिकांना प्राधान्य : मूळचे अमरावती जिल्ह्यातील असणारे रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी देशभर इतरत्र ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना या वॅगन कारखान्यात काम करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं खासदार नवनीत राणा 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. भुसावळ विभागामध्ये असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एकूण 148 कर्मचाऱ्यांनी अमरावती येथील वॅगन कारखान्यात येण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 99 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. या 99 कर्मचाऱ्यांना अद्याप वरिष्ठांनी रिलीव्ह केलं नाही. मात्र, यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मूळ आपल्या जिल्ह्यातील असणार्या या 99 कर्मचाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंदेखील राणा म्हणाल्या आहेत.
प्रकल्पग्रस्तांना दिले जाणार प्राधान्य : लालूप्रसाद हे ज्यावेळी रेल्वेमंत्री होते तेव्हापासूनच्या रेल्वेमधील प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिलं जाणार आहे. बडनेरा येथील रहिवाशांची जागा रेल्वे वॅगन प्रकल्पामध्ये गेली. त्या सर्व कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे वॅगन कारखान्यांमध्ये रोजगार मिळेल. यासाठी मी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्र्यांशी बोलले आहे, असं देखील नवनीत राणांनी सांगितलं.
- आचारसंहितेपूर्वी लोकार्पण : पुढं त्या म्हणाल्या की, "बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याचे उद्घाटन झाले नसले तरी या ठिकाणी महिन्याला पाच रेल्वे वेगनची दुरुस्ती होत आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आता 29 फेब्रुवारीला या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे काम पूर्ण होणार आहे. आचारसंहितेपूर्वी या प्रकल्पाचे लोकार्पण केलं जाईल."
हेही वाचा -