अमरावती Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे ढोल, ताशे, तुतारी जिकडं तिकडं वाजायला लागली असतानाच अमरावती लोकसभा मतदारसंघात मात्र कमालीची शांतता आहे. कुठल्याच राजकीय पक्षांनी अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नाही. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. असं असलं तरी 'हिंदू शेरनी' म्हणून गत काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नवनीत राणा या सातत्यानं स्तुती सुमनं उधळत आहेत. त्यामुळे खासदार नवनीत राणा या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार असतील, अशी पाच वर्षांपासून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. मात्र अद्यापही त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. नवनीत राणा यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी उमेदवारी देणार की नाही याबाबतही शंका व्यक्त व्हायला लागल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात वेट अँड वॉच अशी परिस्थिती आहे. राजकीय चर्चांना मात्र चांगलंच उधाण आलं आहे.
अनिश्चितेचं असं आहे कारण : खासदार नवनीत राणा या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुडबुकमध्ये आहेत. असं असलं तरी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांनी जातीच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवली असा आरोप त्यांच्यावर आहे. उच्च न्यायालयात देखील त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाला असून आता याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतीक्षेपूर्वी भाजपा खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत कुठलाही निर्णय घेऊन आपली फजिती करुन घेणार नाही. यामुळेच सध्या तरी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत भाजपाचे नेते अतिशय सावधपणे प्रतिक्रिया देत आहेत.
नवनीत राणांचा प्रचाराचा धडाका : एकूणच खासदार नवनीत राणा यांच्या जात पडताळणीचं प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा यासंदर्भात नेमका काय निर्णय येईल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. दुसरीकडं नवनीत राणा यांनी मात्र आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. संक्रांतीतील हळदीकुंकवाचे कार्यक्रम संपले असले, तरी खासदार नवनीत राणा यांच्या हळदीकुंकवाची धूम संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानं गावागावात महिलांना साड्यांचं वितरण केलं जात आहे. 'जय श्रीराम'च्या घोषणा देत खासदार नवनीत राणा या आपल्या उमेदवारीबाबत अगदी कॉन्फिडंट पणे वावरत आहेत.
आनंदराव अडसूळही भाजपाच्या वाटेवर ? : शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झालेत. खरंतर नवनीत राणा यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र खोटं असल्याचं प्रकरण आनंदराव अडसूळ यांनीच न्यायालयात रेटून लावलं. नवनीत राणा यांच्या विरोधात निर्णय येईल, अशी अपेक्षा आनंदराव अडसूळ यांना आहे. विशेष म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा आनंदराव अडसूळ यांची असून उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपामध्ये प्रवेश करण्याची देखील त्यांची तयारी असल्याचं बोललं जाते. एकूणच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण असेल, याची प्रतीक्षा नव्हे, तर उत्सुकताच सगळ्यांना लागली आहे.
हेही वाचा :