नाशिक Swimmer Tanvi Chavan Deore : इंग्लिश चॅनल ही अटलांटिक महासागरातील एक खाडी आहे, जी इंग्लंडला फ्रान्सपासून वेगळी करते. ही स्पर्धा डोवर येथून सुरू होते आणि फ्रान्समधील कॅप ग्रीस नेझ येथे संपते. (English Channel) हे अंतर 34 किलोमीटर असून उन्हाळ्यात पाण्याचे तापमान 13 ते 16 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. स्पर्धा २४ तासांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी तन्वी नाशिकच्या जलतरण तलावावर गेल्या दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहे. तिने आताच सलग 12 तास पोहण्याचा सराव केला आहे. आपण नक्कीच इंग्लिश खाडी पार करत भारताचे नाव उंचावेल अशी तन्वीला आशा आहे.
तन्वीची निवड आणि तयारी : इंग्लिश खाडी ही स्पर्धा ही चॅनेल स्विमिंग असोसिएशन डोहर (युके) या अधिकृत संघटनेमार्फत घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता 15 डिग्री सेल्सिअस तापमानात सहा तास स्विमिंग असोसिएशनच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक असते. तन्वीने ही पात्रता फेरी हिवाळ्यात 11 डिग्री सेल्सिअस तापमानात नैनिताल येथे असोसिएशनच्या निरीक्षकांमार्फत सहा तास स्विमिंग करून दिली. त्यामध्ये ती यशस्वी झाल्याने तिला या स्पर्धेत प्रवेश मिळाला. तन्वीची निवड दोन्ही प्रकारात रिले आणि वैयक्तिक झाली आहे. रिलेमध्ये चार जलतरणपटू प्रत्येकी 8 किलोमीटर स्विमिंग करतील. तन्वीसोबत दोन भारतीय, एक अमेरिकन आणि एक ब्रिटीश जलतरणपटू रिले संघात आहेत. रिले स्पर्धा 13 ते 14 जून 2024 दरम्यान होणार आहे.
तन्वी दोन मुलांची आई : इंग्लिश खाडी यशस्वीपणे पार करण्याचा निर्णय तन्वीने वयाच्या 33 व्या वर्षी आणि दोन मुलांची आई असताना घेतला आहे. हे खूप विशेष आहे. ही खाडी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास इंग्लिश चॅनल पूर्ण करणारी भारतातील पहिली आई होण्याचा मान तन्वीला मिळणार आहे.
अनेक स्पर्धांमध्ये केले यश संपादन : तन्वीला वयाच्या 7 व्या वर्षांपासून स्विमिंगची आवड आहे आणि तिने अनेक पदके जिंकली आहेत. आतापर्यंत शालेय आणि संघटनेच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्राप्त केली आहेत. शिवाय धरमतर्फे गेटवे ऑफ इंडिया (35 किलोमीटर), संक रॉक ते गेटवे ऑफ इंडिया (पाच किलोमीटर) आणि इंडियन नेव्ही च्या नेव्ही डॉक यार्ड मध्ये होणाऱ्या सहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या जिंकलेल्या आहेत. तसेच मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या नदीतील 19 किलोमीटर स्पर्धा देखील जिंकलेली आहे. या अनुभवाच्या जोरावर तन्विने इंग्लिश चॅनल पात्रता फेरी पार केली. इंग्लिश चॅनेल स्पर्धेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर तन्वीने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत मोठ्या जिद्दीने मुख्य कोच बेंगलोर येथील श्रीकांत विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. मुख्यकोच यांनी दिलेल्या स्विमिंग प्रोग्राम नुसार तिने काही दिवस बेंगलोर येथे आणि मग नाशिक येथे सेवानिवृत्त साई जलतरण प्रशिक्षक श्री शंकर मालगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सात ते आठ तास स्विमिंगचा सराव सुरू केला. तर आठवड्यातून एकदा 11 ते 15 तास स्विमिंगचा सराव सुरू आहे. स्पर्धा दिवस आणि रात्र यादरम्यान होणार असल्याने सराव देखील दिवस व रात्र करत आहे.
स्वप्न साकार करण्याचा ध्यास : तन्वीने 2010 पासून स्विमिंगचा सराव बंद केल्यानंतर लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लग्न झाल्यानंतर तिला दोन जुळी मुले आहेत व ते आज सहा वर्षांचे आहेत. अशा परिस्थितीत स्वप्न साकार करण्यासाठी तन्वीने पुन्हा नव्या उमेदीने आणि जिद्दीने 2023 मध्ये सरावास सुरुवात केली. या तिच्या प्रयत्नात तिला सासरच्या आणि माहेरच्या सर्व लोकांची उत्तम साथ मिळाली. ते सर्व नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी सरावाच्या वेळी उपस्थित असतात. तन्वी स्विमिंगचा सराव करण्यासाठी नाशिक मनपाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, त्याचप्रमाणे केन्सिंग्टन क्लब हाऊस येथील जलतरण तलाव येथे जाते. यासाठी तिला मनपा आयुक्त, जलतरण तलाव येथील कर्मचारी तसेच केन्सिंग्टन क्लब हाऊस यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तन्वीने इंग्लिश चॅनेल पार करून नाशिकची पहिली जलतरणपटू होण्याचा मान मिळवावा ही नाशिककरांची अपेक्षा आहे; कारण यापूर्वी नाशिकच्या कोणत्याही जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग देखील घेतलेला नाही. तिचा सराव व जिद्द बघता तन्वी ही स्पर्धा निश्चितच पार करेल याचा विश्वास वाटतो.
हेही वाचा:
- 'किंग' कोहलीने रचला नवा इतिहास; ठरला आयपीएलमध्ये ८००० धावा करणारा पहिला फलंदाज - Virat Kohli Record
- आरसीबीच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती, जाणून घ्या त्याची कारकीर्द - Dinesh Karthik Retirement
- राजस्थानचा बंगळुरूवर 4 गडी राखून 'रॉयल' विजय, विराटचे विजेतेपदाचे स्वप्न उद्धवस्त! - RR vs RCB IPL 2024