नाशिक Nashik Crime: तुमच्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज मिळून आलं असून मनी लॉन्ड्रीगच्या केसच्या नावाखाली तुम्हाला अटक करून तुरुंगात डांबण्यात येईल, अशी भीती दाखवत नाशिकच्या डॉक्टर आणि उद्योजकाला तब्बल 31 लाख रुपयाचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नाशिकच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं काय घडलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुबोध परदेशी हे डॉक्टर असून नाशिकच्या अशोक नगर परिसरात राहतात. त्यांना एका अज्ञात नंबर वरून फोन आला. त्या व्यक्तीनं सांगितलं की, तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळून आलं आहे. तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल क्रमांक चुकीच्या कामासाठी वापरला जात आहे, असं सांगत आरोपीनं फिर्यादी आणि त्याचा उद्योजक मित्र जोगिंदर सिंह यांना व्हिडीओ कॉल कनेक्ट होण्यास भाग पाडलं. त्यानंतर मोबाईल वरून मुंबई पोलीस सीबीआय आणि ईडी कार्यालयातून बोलत असल्याचं सांगून अटकेची भीती दाखवत तुम्ही मनी लॉन्ड्रीगमध्ये सहभागी आहात, अशी धमकी दिली. यातून बाहेर पडण्यासाठी तडजोड करावी लागले, असं सांगून केसच्या तपासाच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये परदेशी यांनी 23 लाख 10 हजार तर सिंह यांनी 7 लाख 64 हजार असे दोघांचे मिळून 30 लाख 74 हजार वर्ग करण्यास भाग पाडलं. याबाबत डॉक्टर परदेशी यांनी आणि उद्योजक सिंह यांनी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अनोळखी ॲपला बळी पडू नका : अनोळखी ॲपकडे दुर्लक्ष करा. तसंच सोशल मीडियावरील कुठल्याही लिंक,ॲप डाऊनलोड करताना खात्री करावी. अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. या गुन्ह्यात पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्यांसह, मोबाईल क्रमांक ट्रेस केला जातोय. या प्रकरणाचा तपास लवकरच लागू शकतो असं सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी सांगितलं.
अज्ञान व्यक्तीनं ओटीपी मागितल्यास पोलिसांशी संपर्क साधावा : सोशल मीडिया वापरतांना काळजी घ्या. सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे प्रत्येकानं आपल्या प्रोफाइलची काळजी घेणे गरजेचे आहे. खास करून मुलींनी आपलं प्रोफाइल लॉक ठेवलं पाहिजे. अनेक घटनांमध्ये हॅकर्स मुलीचे अश्लील फोटो वापरून ब्लॅकमेल करतात. तसंच सध्या पार्ट टाइम जॉबच्या नावानं अनेक लाखोंचा गंडा घातला जात आहे. त्यामुळे पूर्ण खात्री केल्याशिवाय आपण पैसे पाठवू नये किंवा अज्ञात व्यक्तीला आपल्या बँकेचा तपशील देऊ नये. तसंच मोबाईलवर येणारी कोणतीही लिंक क्लिक करू नये, अनेक केसेसमध्ये रिमोर्ट एक्सेस अँपचा वापर करून हॅकर्स बँक खातं रिकामं करतात. त्यामुळे कुठली ही लिंक आल्यास किंवा कोणी अज्ञात व्यक्तीनं ओटीपी मागितला तर सायबर सेलशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हेही वाचा