नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशन हद्दीत तोतया आयपीएस अधिकारी बनून एका व्यवसायकाची एक कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीनं बनावट ओळखपत्रं दाखवून रेल्वेचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर आरोपीनं व्यवसायकांना बंदुकीचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : नाशिकच्या अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक विठ्ठल सखाराम वाकडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, आरोपी गौरव मिश्रा याच्याशी त्यांची 2018 मध्ये ओळख झाली. मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्याचं भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून, लाल-निळ्या दिव्यांच्या गाडीतून फिरत असे. त्यानं शासनाचा उच्च अधिकारी असल्याचं दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्रा यानं वाकडे यांना रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्यांनी आरोपी मिश्राला रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सिक्युरिटी डिपॉझिट, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 88 हजार रुपये इतकी रक्कम दिली.
खंडणीची केली मागणी : कालांतरानं वाकडे यांना मिश्राच्या तोतयागिरीची जाणीव झाली. त्यांनी मिश्राकडं पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळाटाळ करू लागला. 13 ऑक्टोबर 2024 रोजी मिश्रानं वाकडे यांना पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेटण्यासाठी बोलावलं. तेथे 10 ते 12 गुंडांना सोबत घेऊन आलेल्या मिश्रानं वाकडे यांना बंदुकीचा धाक दाखवून पैसे विसरून जाण्याची धमकी दिली. तसंच, त्यांच्याकडं दरमहा 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली.
यापूर्वीही एका प्रकरणात गुन्हा दाखल : काही दिवसांनी विठ्ठल वाकडे यांना कळालं की, इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये मिश्राविरुद्ध या अगोदरही तोतयागिरीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत गौरव मिश्रा विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी मिश्रा विरोधात विश्वासघात, खंडणी, धमकी आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस वाहनातून फिरायचा : तोतया गौरव मिश्रा याच्याकडं दोन महागड्या गाड्या असून सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. यात प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं नाशिक शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोतयाची ओळख करून दिली होती. तर दोन वर्षापासून तो शहरातील अधिकाऱ्यांसोबत पोलीस वाहनातून फिरत असल्याचं तपासात समोर आलंय.
हेही वाचा -
- 300 कोटींच्या घोटाळ्यातील फरार आरोपीला वृंदावनमधून अटक, साधूच्या वेशात राहून देत होता हुलकावणी - Accused In Guise Monk Mathura
- गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचा बनाव; पैसे भरायला निघालेल्या वकिलाला भामट्यांनी घातला गंडा - Mumbai Crime
- मंत्री धनंजय मुंडेंच्या नावाचा गैरवापर; आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याला घातला गंडा - Dhananjay Munde Name Fraud