मुंबई NCP Ministerial Allotment : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आज देशभरातून 41 जण शपथ घेणार आहेत, तर महाराष्ट्रातून सहा मंत्री शपथ घेणार आहेत. यात भाजपाचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, आरपीआयचे रामदास आठवले आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे शपथ घेणार आहेत. मात्र, महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्लीत खलबतं सुरू : आज सायंकाळी शपथविधी पार पडत असताना दुसरीकडे दिल्लीत मंत्रिपदावरून घडामोडींना अतिशय वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यात बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांना मंत्रिपद मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. कालपर्यंत या दोघांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होती. पण अद्यापपर्यंत अशी काही माहिती समोर येत नाही किंवा या दोघांच्या नावाची चर्चा नाही. त्यामुळे दिल्लीत बैठक सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अजून फोनच्या प्रतीक्षेत : एकीकडे महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना यांना एक मंत्रिपद मिळाले आहे. त्याबद्दल आमच्या मनात काही नाही दुःख वाटण्याचाही कारण नाही; मात्र आपणही महायुतीतील मित्रपक्ष आहोत. कालपर्यंत आमच्या पक्षाला एक मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती; मात्र अद्यापपर्यंत पंतप्रधान कार्यालयातून कोणताही फोन आलेला नाही, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. आमच्या पक्षातील नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यापैकी कोणाला एक मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे. सायंकाळी शपथविधी होणार आहे. याला अजून अवधी आहे. त्यामुळं अजूनही आम्ही पीएमओ कार्यालयातून फोन येईल याच्या प्रतिक्षेत असल्याचंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.
पक्षात अंतर्गत वाद? : दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद न मिळाल्यामुळे पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर पक्षातील कोणाला मंत्रीपद द्यायचे यावरून पक्षातच अंतर्गत वाद असल्याची ही माहिती समोर येत आहे. प्रफुल पटेल? की सुनील तटकरे? या दोघांपैकी कोणाला मंत्रिपद द्यायचे. यावरून पक्षात मत-मतांतर आहे. प्रत्येक वेळी प्रफुल पटेल यांचेच नाव पुढे येते, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी सुनील तटकरे यांना संधी मिळावी असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. म्हणून मंत्रीपदावरून पक्षातच एकमत होत नसून, मंत्रीपदावरुन पक्षांतर्गतच वाद असल्याचे समजते.
हेही वाचा: