मुंबई Nana Patole on Atal Setu : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतुचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच या रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला (Atal Setu Cracks) असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. यात महायुती सरकारनं भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या असून, कर्नाटकातील आधीचं भाजपाचं सरकार 40 टक्के कमिशनवालं होतं, तर राज्यातील महायुतीचं सरकार 100 टक्के कमिशनखोर असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.
नाना पटोलेंची टीका : नाना पटोले यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत अटल सेतुची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याला भेगा पडल्याचं निदर्शनास आणून दिलं. शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी सरकारनं 18 हजार कोटी रुपये खर्च केले. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं आहे. तसंच सदर प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देऊन भ्रष्टाचार करणं हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचा टोला पटोले यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्प उद्घाटनापूर्वी प्रकल्पाची पाहणी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
अधिवेशनात जाब विचारणार : "भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात प्रवेश देऊन मंत्री बनवतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. एक टेकडीही फोडली असून पर्यावरणाचा ऱ्हास केलाय. उच्च न्यायालयानं या सर्व घटनांमध्ये स्वतः लक्ष घालावं. तसंच काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारी सरकारला अधिवेशनात जाब विचारल्या शिवाय राहणार नाही," असं नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची टीका : अटल सेतू कामाच्या दर्जाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सोशल मीडियावर पोस्ट करत, मोदी सरकारची गॅरंटी ही पूर्णपणे फसवी असल्याचा आरोप केला आहे. सुविधांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामं करुन जनतेच्या स्वप्नांना थूकपट्टी लावण्याचं काम मोदी सरकारनं केल्याचा घणाघात या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर तडे नाहीत : अटल सेतूबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अटल सेतुला तडे गेल्याची अफवा पसरवली जात असून, त्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रकल्प प्रशासनाकाडून करण्यात आलंय. सेतुला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळल्या असून, तो पुलाचा भाग नाही. यामुळं पुलाला कोणताही धोका नाही. याबाबत प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमनं 20 जून 2024 रोजी केलेल्या तपासणीदरम्यान, उजवीकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. त्या त्वरीत दुरुस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज 4 चं कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीनं सदर भागातील दुरुस्तीचं काम सुरू केलं असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं.
हेही वाचा :