नागपूर Nagpur School Bus Stuck On Track : नागपुरात एक मोठा अनर्थ टळलाय. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली होती. मात्र, एका नागरिकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. त्यामुळं 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. सदरील घटना नागपूर-छिंदवाडा रेल्वेमार्गावरील खापरखेडा रेल्वे क्रॉसिंग इथं घडली. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.
नेमकं काय घडलं? : एक स्कूल बस 40 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेतून घरी जाण्यास निघाली असताना नागपूर-छिंदवाडा रेल्वे मार्गावरील खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवर अचानक रेल्वे फाटक बंद झालं. यावेळी बससोबतच एक कार देखील रेल्वे रुळावर अडकली. त्याचवेळी छिंदवाडा-नागपूर रेल्वे बसच्या दिशेनं वेगात येत असल्याचं बघून बसमधील सर्व विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केला. यावेळी एका सुज्ञ नागरिकानं तातडीनं प्रसंगावधान दाखवत लाल रंगाचे कठडे रेल्वे रुळावर ठेवले. हे कठडे बघून रेल्वे चालकाला संशय आला आणि त्यानं लगेच रेल्वेचे ब्रेक दाबले. थांबलेली रेल्वे बघून विद्यार्थ्यांसह इतरांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यानं एका बाजूचं फाटक उघडलंं आणि रुळावर अडकलेली स्कूल बस आणि कार बाहेर निघाली. त्यामुळं काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, याची प्रचिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांना आली.
मुंबईत काय घडलं? : काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मुंबईतही घडली होती. पनवेल स्थानकावरुन ठाण्याकडं जाणारी लोकल बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकावर येताच, एक महिला पाय घसरुन रेल्वे रुळावर पडली. यावेळी रुळावर पडलेल्या महिलेच्या अंगावरुन रेल्वेचा पहिला डबा गेला. नागरिकांनी आरडाओरड करताच मोटरमननं रेल्वे मागं घेऊन थांबवली. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यात आलं. त्यामुळं महिलेचे प्राण वाचले.
हेही वाचा -
- काळ आला होता, पण . . . रेल्वे ट्रॅकवर पाय घसरुन पडली महिला: दोन्ही पाय गमावले, थोडक्यात वाचला जीव - Mumbai Local Train Accident
- चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानं डबे उलटले, चार प्रवाशांचा मृत्यू - Chandigarh Dibrugarh Train Derailed
- बालासोरप्रमाणं रेल्वे अपघात टळला! पंजाबमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक, नेमकं काय घडलं? - Fatehgarh Sahib Train Accident