नागपूर Child Death Cat Bite : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उखळी या गावात राहणाऱ्या 11 वर्षीय मुलाचा मांजरानं चावा घेतल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेनं श्रेयांशूच्या कुटुंबावर शोककळा पसरलीय.
मांजरानं घेतला चावा : उखळी गावात राहणारा श्रेयांशू त्याच्या काही मित्रांसोबत खेळत होता. तो सायंकाळी 6 वाजता घरी परत आला. तेव्हा मांजरानं त्याच्यावर अचानकपणे हल्ला केला. त्याच्या पायाचा चावा घेतला असं त्यानं आईला सांगितलं. या घटनेच्या काही वेळानंतस त्याला मळमळ आणि ओकाऱ्या सुरु झाल्या. त्यामुळं त्याचे आईवडील श्रेयांशूला घेऊन हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात गेले. मात्र तिथं डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. श्रेयांशूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आलाय.
आकस्मिक मृत्यूची नोंद : या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळं झाला हे कळू शकेल, असं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलंय.
ही तर अत्यंत दुर्मीळ घटना - डॉ प्रवीण पडवे : मांजरानं चावा घेतल्यानं मृत्यू ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. मांजरानं दंश केल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणं कठीण आहे. मांजरानं हल्ला केल्यानं तो घाबरला. त्यामुळं काही वेळात त्याला ओकाऱ्या सुरू झाल्या. त्यानंतर ओकारी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्यानं मृत्यू झाला असावा. अथवा आणखी कोणत्या विषारी श्वापदानं दंश केला असू शकतो. मांजर चावल्यानं इतक्या कमी वेळात मृत्यू होणं दुर्मीळ आणि अतिशय दुःखद घटना आहे. नेमका मृत्यू कशामुळं झाला, हे आताच सांगणं कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असं तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी सांगितलं.
हेही वाचा :