नागपूर : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election Results 2024) रणधुमाळीचे अंतिम निकाल आता हाती येऊ लागले आहेत. अशातच, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार? याचं चित्र आता पुढं येऊ लागलंय. तर या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अंतिम आकडेवारीनंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कौलनुसार नागपूरच्या 12 मतदारसंघातील अतिशय चुरशीच्या लढतीचे कल हाती आले आहेत. नागपूरच्या निकालाकडं राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. याच कारण म्हणजे, इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे पाटील, काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर वि. सलील देशमुख, कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर (काँग्रेस) , विकास ठाकरे (काँग्रेस) विरुद्ध भाजपाचे सुधाकर कोहळे इत्यादींसह इतर नेते यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं नागपूरच्या 12 मतदारसंघात महायुती की महाविकास आघाडी? यापैकी कोण बाजी मारणार हे निकालाअंती पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नागपूर जिल्ह्यात 61.60 टक्के मतदान : विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी उत्साहानं मतदान केलं. नागपूर जिल्ह्यात 61.60 टक्के मतदान झालं. जिल्ह्यात 45 लाख 25 हजार 997 एकूण मतदार असून त्यापैकी 14 लाख 22 हजार 676 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर 13 लाख 65 हजार 491 महिलांनी मतदान केलं. पुरुषांची टक्केवारी 62.84 इतकी आहे, तर 60.37 टक्के महिलांच्या मतदानाची टक्केवारी आहे.
हेही वाचा -