मुंबई PM Narendra Modi in Mumbai : लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आले. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं हा सोहळा झाला. यात तब्बल 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं.
गरीब आणि शेतकऱ्यांसाठी घरं : 'देशाचे संविधान धोक्यात आहे' हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला. या प्रचाराच्या मुद्द्याचा भाजपाला महाराष्ट्रात जोरदार फटका बसल्याचं निकालावरून दिसून येतं. मात्र, ही डागळलेली इमेज पुन्हा एकदा आपल्या भाषणातून सुधारण्याचा प्रयत्न करताना पंतप्रधान दिसले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "एनडीए सरकारचे विकास मॉडेल वंचितांना प्राधान्य देण्याचे आहे. अनेक दशकांपासून शेवटच्या रांगेत असणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. नव्या सरकारने शपथ घेताच आम्ही गरीब आणि शेतकऱ्यांसाठी पक्क्या घरांशी संबंधित मोठे निर्णय घेतले आहेत."
देशाचा विकास तिपटीने वाढेल : या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मुंबईत सुरू झालेल्या विकास प्रकल्पांमुळे संपर्क वाढेल. शहरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. याचा शहरवासीयांना मोठा फायदा होणार आहे. विकसित भारत घडवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. देशातील जनतेला सतत वेगवान विकास हवा आहे. येत्या 25 वर्षांत भारताचा विकास करायचा आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आधीच म्हटलं होतं, पुन्हा एकदा एनडीए सरकार आल्यावर या देशाचा विकास तिपटीने वाढेल. सध्या होऊ घातलेली काम म्हणजे त्याच विकासाचा एक भाग आहे."
नवीन रोजगार निर्माण झाले : पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे मुंबईचा आसपासच्या भागांशी संपर्क वाढेल. महाराष्ट्र हे जगातील सर्वात मोठे आर्थिक पॉवर हाऊस आणि मुंबईला जागतिक फिनटेक राजधानी बनवणे हे माझे ध्येय आहे. छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे उत्साहात स्वागत केले आहे. नुकताच RBI ने नोकऱ्यांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात सुमारे 8 कोटी नवीन रोजगार निर्माण झाले. या आकडेवारीने प्रोपोगंडा पसरवणाऱ्यांना थेट उत्तर आहे. आमचे विरोधक गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि देशाच्या विकासाला विरोध करतात आणि आता ते उघड होत आहे."
वारीसाठी दिल्या शुभेच्छा : यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचं म्हटलं. तसंच मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत मोदींनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसंच त्यांनी यावेळी वारकऱ्यांना वारीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
विरोधकांवर टीकास्त्र : या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर देखील टीका केली. ते म्हणाले, "रोजगारावरून खोटे नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांची बोलती बंद केली. खोटे नॅरेटिव्ह सेट करणारे गुंतवणुकीचे शत्रू आहेत. इन्फ्रास्ट्रकरच्या निर्मितीतील ते शत्रू आहेत, विरोधक हे भारताच्या विकासाचे शत्रू आहेत. यांचं धोरण तरुणांचा विश्वासघात आणि रोजगार रोखणारं आहे. आता त्यांची पोलखोल होत आहे. त्यांचा खोटेपणा उघड होत आहे. पूल तयार होत असेल, रेल्वे ट्रॅक होत असेल, रोड होत असेल तर कुणाला तरी रोजगार मिळतोच. देशात इन्फ्रास्ट्रक्चरची गती वाढत आहे, तसंच रोजगाराची गतीही वाढत आहे. येत्या काळात अधिक संधी निर्माण होणार आहेत."
मुंबईला आर्थिक राजधानी बनवायचं : राज्याबाबत बोलताना मोदी म्हणाले, "माझं ध्येय मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवायचं आहे. महाराष्ट्र पर्यटनामध्ये भारतातील अव्वल राज्य बनावं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार किल्ले आहेत. इथं सह्याद्रीच्या रांगा आहेत. कोकणातील अथांग समुद्र आहे. भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हा कार्यक्रम हेच ध्येय गाठण्यासाठी आहे."
तीन कोटी लोकांना घरं मिळतील : "वंचितांना प्राधान्य देणं एनडीएच्या विकासाचं मॉडेल आहे. दशकांपासून वंचित लोक दूर होते. त्यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. आमच्या सरकारनं पक्की घरं आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठे निर्णय घेतले. आतापर्यंत चार कोटी लोकांना घरं मिळाले आहेत. येत्या काळात तीन कोटी लोकांना पक्की घरं मिळतील. यात महाराष्ट्रातील गरीब, आदिवासी लोक सामील आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाले.
विविध प्रकल्पांचं लोकापर्ण व भूमिपूजन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. त्यामध्ये, एमआरडीए अंतर्गत येणारा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 16 हजार 600 कोटी रुपये इतका आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्यांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सहा हजार तीनशे कोटी रुपये इतका आहे. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ देखील केला. या योजनेचा खर्च 5 हजार 540 कोटी इतका आहे. मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चे लोकार्पण करण्यात आले. या दोन फलाटांच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने तब्बल 52 कोटी रुपये खर्च केले आहेत. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी देखील यावेळी करण्यात आली. मध्य रेल्वेचे या प्रकल्पासाठी 813 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्यात आले, ज्याचा खर्च 64 कोटी रुपये इतका आहे. तुर्भे येथे गती शक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी देखील याचवेळी करण्यात आली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 27 कोटी रुपये इतका आहे.
हेही वाचा :