ठाणे Thane Murder Case : "खून का बदला खून" म्हणत भर रहदारीच्या रस्त्यात प्रतिस्पर्धी गुन्हेगार टोळीकडून धारधार शस्त्राने वार करून, २६ वर्षीय गुन्हेगार तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना कल्याण पूर्वेतील १०० फुटी चौक परिसरात भर रस्त्यात असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी घडली होती. याप्रकरणी आज नवीन कायदा कलमानुसार पाच गुन्हेगार आरोपींवर कोळसेवाडी पोलीस (Kolshewadi Police) ठाण्यात हत्येचा गंभीर गुन्हा दाखल करून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
दोन आरोपींवर गुन्हे दाखल : अटक आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. शोक उर्फ साहिल नसीर शेख, (वय २१, रा. वालधुनी अशोकनगर कल्याण पूर्व) विद्यासागर तुलसीधारन मूर्ती उर्फ अण्णा (वय २१, रा. पिसवली कल्याण पूर्व) पेंड्या अर्जुन काळपांडे (रा. कल्याण पूर्व) असं अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे असून यामधील दोन आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर संदीप नंदू राठोड (वय २६) असे निर्घृण हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे.
दिवसाढवळ्या तरुणाची हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक संदीप हा सराईत गुन्हेगार कल्याण पूर्वेतील महालक्ष्मीनगर परिसरात कुटूंबासह राहत होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यातच काही दिवसापूर्वी अटक आरोपीपैकी एका मित्राच्या हत्या करण्याच्या प्रयत्नात मृतक संदीपचा सहभाग असल्यानं त्याच्यासह त्याच्या मित्रांवर डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मृत संदीप सोमवारी (१ जुलै) सायंकाळच्या सुमारास पूर्वेतील १०० फुटी चौक परिसरात एका बियर बारमध्ये बियर खरेदीसाठी आला होता. त्याच सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने फिल्मी स्टाईलने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात संदीपचा मृत्यू झाला. ज्या चौकात ही हत्या झाली तो चौक अतिशय रहदारीचा आहे. त्या रस्त्याने हजारो गाड्या रोज ये-जा करतात. असं असलं तरीही या चौकात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या भयानक घटनेमुळं कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांचा धाकच राहिला नाही : या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी कल्याण गुन्हे शाखेचे पथक आणि कोळसेवाडी पोलीस पथकाने समांतर तपास सुरू केला. घटनेच्या २४ तासाच्या आताच चार आरोपीना अटक केली. त्यांच्यावर नवीन कायद्यानुसार बीएनएस २०२३ चे कलम १०३ (१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० मपोका कलम ३७ (३) १३५ शस्त्र अधिनियम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. मात्र, भर चौकात हत्या झाल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अशा घटना घडत असून, पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं बोललं जातय.
हेही वाचा -