मुंबई licensed Arms : लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) बिगुल राज्यात वाजलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर परवानाधारक शस्त्रं ज्यांनी घेतलेली आहेत, त्या त्या विभागातील पोलीस ठाण्याला नोटीस देऊन, शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती, हेडकॉर्टर एकचे पोलीस आयुक्त महेश चिमटे यांनी दिलीय.
बंदूक परवान्यांवर पोलिसांची करडी नजर : निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा एक भाग म्हणून ही कार्यवाही केली जात आहे. मुंबईत एकूण 11 हजार 500 शस्त्र परवानाधारक आहेत. 22 हून अधिक जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. बारा पेक्षा जास्त शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दादर पोलीस ठाण्यात खुलेआम गोळीबार करणारे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तूल त्यावेळी ताब्यात घेण्यात आले होते. तसंच काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटाचे आमदार अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर अन्य राज्यातील बंदूक परवान्यांवर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे.
शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परवानाधारक शस्त्रे प्रशासनाकडं जमा करून घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आचारसंहिता लागताच ही कारवाई सुरू करण्याचे निर्देश पोलीस ठाण्यांना दिलेल्या नोटीसीमध्ये देण्यात आलेत. निवडणूक आयोगानं देखील दिलेल्या निर्देशांचं पालन करून जिल्हा छाननी समिती कोणत्या व्यक्तीची शस्त्रे जमा करायची याचा निर्णय घेत असते आणि पोलीस त्यानुसार त्याची अंमलबजावणी करतात.
परराज्यातील शस्त्र परवाने बाळगण्याचे प्रमाण आधिक : मुंबईतील 90 पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे राजकीय नेतेमंडळी, व्यवसायिक आणि सुरक्षा रक्षक यांच्याकडील शस्त्रांच्या परवान्यांची माहिती द्यावी. त्याचप्रमाणं संबंधितांच्या परवानांचे मुदत संपलेली आहे का?, त्यांचे परवाने रद्द झाले आहेत का? तसंच बोगस लायसेन्सधारकांवर कारवाई करावी असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. मुंबई शहरात राज्याबाहेरून आलेल्या परराज्यातील शस्त्र परवाने बाळगण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यापैकी अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर काहींची मुदत संपलेली आहे. अशी शस्त्रे आणि परवाने जप्त करण्याचे आदेश देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आले आहे.
हेही वाचा -