मुंबई Mumbai Police Dog Squad : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी जवळपास 52 हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. तसंच मुंबईतील अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी पोलिसांच्या श्वान पथकावर देखील आहे. त्यामुळं या श्वानाचा मुंबई पोलिसांकडून विमा उतरवला जाणार आहे.
श्वानांचा विमा काढण्यासाठी पत्र : मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाकडं वर्षभरात 50 ते 60 कॉल येतात. मुंबई पोलिसांच्या 52 हजार कर्मचाऱ्यांसह 32 श्वानांवर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाला 2023 या वर्षात 58 कॉल्स आले आहेत. तर ड्रग्जची माहिती देण्यासाठी यावर्षी जूनपर्यंत 20 कॉल आले आहेत. त्यामुळं मुंबई पोलिसांसोबतच श्वान पथकावर सुरक्षेची मोठी जबाबदारी असल्यानं त्यांचा विमा उतरवण्यात येत आहे. याआधी ठाण्यातील श्वानांचादेखील अशा प्रकारे विमा काढण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या आठ श्वानांचा 22 हजार 125 रुपयांचा विमा काढण्यासाठी मुंबई पोलिसांना श्वान पथकाच्या अधिकाऱ्यानं पत्र पाठवलंय.
आठ श्वानांचा विमा काढणार : श्वान पथकातील पोलीस निरीक्षक जॉन गायकवाड यांनी सांगितलं, "आठ श्वानांसाठी 22 हजार 125 इतका वार्षिक प्रीमियम भरावा लागणार आहे. खर्च मंजुरीसाठी पत्र मुंबई पोलीसांना पाठवलं असून लवकरच मंजुरी मिळेल. न्यू इंडिया ॲश्यूरन्स कंपनीकडून हा विमा काढण्यात येणार आहे. या विमा पॉलिसीमध्ये श्वानांचा रेबीज, व्हायरल हेपेटायटीस, लेप्टोस्पायरोसिस, व्हायरल एन्टरिटिस यासारख्या आजारानं मृत्यू झाल्यास परतावा मिळतो. तसंच श्वानाची चोरी झाल्यास, शासकीय कामानिमीत्त अथवा शासकीय वाहनातून प्रवास करताना श्वानाला अपघात झाल्यास विमा मिळवता येणार आहे. याबाबत कंपनीकडून 80 टक्के रक्कम दावा केल्यानंतर मिळणार आहे. ही रक्कम मुंबई पोलिसांच्या खात्यात जमा होणार आहे".
असा असणार प्रीमियम : श्वानपथक (प्रतिबंधक), गुन्हे शाखा, मुंबई या शाखेतील 8 श्वानांचा विमा काढण्यात येणार आहे. त्यामुळं दि. न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनीला एकूण रक्कम 22 हजार 125 मंजूर धनादेशाद्वारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा सेल विभागाकडून देण्यात येईल. 20 हजार विमा रक्कमेसाठी दीड हजार तर, 30 हजार विमा रक्कमेसाठी साडेतीन हजार प्रीमियम आहे. एका श्वानाचा 2766/- रुपये प्रीमियम असून आठ श्वानांचा 22 हजार 125 रुपये वार्षिक प्रीमियम आहे.