मुंबई Ravindra Waikar : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट दिल्याची माहिती आता समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याबाबतचा सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला. या अहवालात मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गैरसमजुतीतून रविंद्र वायकर यांच्या विरोधात तक्रार दिल्याचं म्हटलं आहे. हा सर्व प्रकार गैरसमजातून घडल्यानं आता रवींद्र वायकर यांच्यावरील गुन्हे मागं घेत असल्याचं मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.
रवींद्र वायकर यांच्यावर आरोप काय? : लोकसभा निवडणुकीच्या आधी साधारण डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी इथं भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला. तेव्हा रवींद्र वायकर हे शिवसेना ठाकरे गटात होते. यात किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीच्या भूखंडावर रवींद्र वायकर यांनी एक फाइव स्टार हॉटेल बांधण्याचा प्रयत्न केला. यातून जवळपास 500 कोटींचा घोटाळा वायकर यांनी केला," असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. रवींद्र वायकर यांच्या या प्रकारामुळं पालिकेचा महसूल बुडाल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंता संतोष मांडवकर यांनी आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रार दिली. या प्रकरणावर आता मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिली आहे.
सर्वांवरील गुन्हे घेतले मागं : कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या सोबतच खासदार वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर, आर्किटेक्ट अरुण दुबे, आसू नेहलानी, प्रीथपाल बिंद्रा, राज लालचंदानी यांना देखील सहआरोपी करण्यात आलं होतं. मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात रवींद्र वायकर यांना क्लीन चीट दिल्यानं या सर्वांवरील गुन्हे मागं घेत असल्याचं मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला असला तरी, पोलिसांनी पालिकेवरच गैरसमजुतीतून गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवल्यानं यावर आता पालिका नेमकी काय भूमिका घेते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा
- महायुती सरकारचा अर्थसंकल्प 'गाजर' : सरकारच्या घोषणा म्हणजे जुमले; अर्थमंत्री अजित पवारांच्या उत्तरावर विरोधक असमाधानी - Maharashtra budget
- दीक्षाभूमीचा कारभार राष्ट्रीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावा, 'या' आंबेडकरवादी नेत्याची मागणी - Bhimrao Ambedkar About Deekshabhumi
- लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा : महिलांना कुठंही जाण्याची गरज नाही; सरकार राबवणार ‘सातारा पॅटर्न’ - शंभूराज देसाई - Chief Minister Ladki Bahin Yojana