मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बुधवारी (23 ऑक्टोबर) अटक केली. मुंबईच्या वरळी पोलिसांनी त्याला झारखंडच्या जमशेदपूर येथून अटक केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज आला होता. त्यात अभिनेता सलमान खानकडं 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता जमशेदपूरच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
चौकशी सुरू : एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "वरळी पोलिसांचे पथक ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी करत आहे. पुढील कारवाईसाठी त्याला मुंबईत आणण्यात येईल." मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर धमकीचा मेसेज आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान, धमकीचा संदेश झारखंडमधील एका नंबरवरून पाठवण्यात आल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं झारखंडला रवाना केली होती. त्यानंतर आरोपीला जमशेदपूरमधून अटक करण्यात आली.
धमकी देणाऱ्यानं मागितली होती माफी : "हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत रहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचं असेल तर 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल," अशा आशयाचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला होता. त्यानंतर काही दिवसांनी मुंबई वाहतूक पोलिसांना पुन्हा याच व्हॉट्सॲप नंबरवरून आणखी एक मेसेज आला. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीनं माफी मागितली होती. हा मेसेज चुकून पाठवण्यात आल्याचं मेसेज पाठवणाऱ्यानं म्हटलं होतं. तसंच त्याबद्दल त्यानं माफी मागितली होती.
हेही वाचा -