मुंबई Devendra Fadnavis Death Threat : एका मुलाखतीदरम्यान आरोपीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात धमकी आणि अवमानकारक वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी मुख्य आरोपी किंचक नवले (वय 34) याला अटक केली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या नवलेला 2 मार्च रोजी साताऱ्यात अटक करण्यात आली होती. त्याला वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. आरोपी किंचक नवले हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे. अटक टाळण्यासाठी किंचक नवले हा वेशांतर करुन राहत होता.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा सरपंच असल्याचा दावा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाशी आरोपी किंचक नवले हा संबंधित आहे. तो बीड जिल्ह्यातील भडंगवाडी इथला सरपंच असल्याचा दावा करत होता. किंचक नवले याला शनिवारी सांताक्रुज पोलिसांनी ताब्यात घेऊन वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं आरोपी किंचक नवले याला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अटक टाळण्यासाठी वेशांतर करुन राहता होता साताऱ्यात : बीड जिल्ह्यातील भडंगवाडी येथील शेतकरी किंचक नवले हा अटक टाळण्यासाठी वेशांतर करून साताऱ्यात राहत होता. सांताक्रूझ पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या मदतीनं त्याचा साताऱ्यात शोध घेतला. त्यानंतर पोलीस पथकानं स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं किंचक नवले याला साताऱ्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन मुंबईत आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी : या संवेदनशील प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी पोलिसांनी किंचक नवले याला दहा दिवसांची कोठडी मागितली होती. काही दिवसांपूर्वी योगेश सावंत यानं किंचक नवले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी योगेश सावंत याला ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सावंत याच्यावर आहे. त्याला न्यायालयानं सुरुवातीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सांताक्रूज पोलिसांनी फेरविचार अर्ज केल्यामुळं योगेश सावंत याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
सोशल माध्यमांवर बदनामीकारक वक्तव्य आणि धमक्या : सांताक्रूझ पोलीस ठाण्यात 28 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींवर सोशल माध्यमांवर बदनामीकारक वक्तव्यं आणि धमक्या दिल्याचा आरोप आहे. सांताक्रूज पोलिसांनी शिवसेना युवासेनेचे कार्यवाह अक्षय पनवेलकर (वय 32) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन भारतीय दंड विधान कलम 153 (अ), 500, 505, 506 (2), 120, ब आणि 34 यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
योगेश सावंतला 14 दिवसांची कोठडी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमावरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबईतील सांताक्रुज येथील योगेश सावंत या आरोपीला वांद्रे न्यायालयातील दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसाची कोठडी सुनावलेली आहे. 28 फेब्रुवारी रोजी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. 27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास तक्रारदार पनवेलकर यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, की " आरोपी योगेश सावंत यानं सांताक्रुज येथून समाज माध्यमावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बदनामीकारक वक्तव्य केलेलं आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिलेली आहे."
हेही वाचा :