मुंबई Mumbai Narali Purnima News : मुंबईसारख्या शहरात परंपरा आणि संस्कृती जपताना सुरुवातीपासून गिरणगाव नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. आता गिरणी कामगार शिल्लक राहिले नसले तरी लालबाग परळ आणि चिंचपोकळी या परिसराला अजूनही गिरणगाव म्हणून ओळखलं जातं. या परिसरानं नेहमीच परंपरा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलाय. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य महाराष्ट्रीयन सणांचं इथं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी गिरणगावात नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत अनेक नागरिक उत्साहानं सहभागी होतात.
काय असते स्पर्धा? : या स्पर्धेमध्ये दोन्ही स्पर्धकांनी आपापल्या हातात एकेक नारळ घेऊन एकमेकांच्या नारळावर आपटायचा असतो. ज्याचा नारळ फुटेल त्याला पराभूत मानलं जातं. त्यानं फुटलेला नारळ जिंकलेल्या स्पर्धकाला द्यायचा असतो. एकेक स्पर्धक अशा पद्धतीनं 50 ते 60 नारळ जिंकत असतो, असं आयोजक शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी शाखाप्रमुख रमेश सावंत सांगितलं. या स्पर्धेत फुटलेल्या नारळांपासून नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या वड्या आणि इतर पदार्थ केले जातात. त्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जपली जाते. तर दुसरीकडं रक्षाबंधनाच्या दिवशी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्यानं मनोरंजन आणि खेळभावनाही वाढीस लागते, असंही सावंत म्हणाले.
शेकडो नारळ फोडले जातात : या स्पर्धेत दरवर्षी शेकडो नारळ फोडले जातात. चिंचपोकळी लालबाग आणि परळ परिसरात ही स्पर्धा ठिकठिकाणी आयोजित केली जाते. त्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून हजारो नारळ फोडले जातात. "कोकणातील अनेक चाकरमानी या ठिकाणी असल्यामुळं हे नारळ कोकणातून आणले जातात. त्यामुळे कोकणातील शेतकरी बांधवांनाही त्याचा लाभ होतो," असंही सावंत यांनी सांगितलं.
हेही वाचा -