मुंबई Central Railway Jumbo Mega Block : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाण्यातील फलाटांची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं तब्बल 63 तासांचा मेगा ब्लॉक घेतलाय. गुरुवारी मध्य रात्रीपासून या मेगाब्लॉकला सुरुवात झाली असून या ब्लॉकमुळं लोकल ट्रेनच्या 900 फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. त्यामुळं नोकरदार वर्गासह सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी (31 मे) मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. त्यानंतर आता या मेगाब्लॉकचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांवरही पडल्याचं चित्र बघायला मिळतंय.
कोणत्या परीक्षा रद्द? : मेगा ब्लॉकमुळं मुंबई विद्यापीठाच्या दोन परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या काही परीक्षा पार पडल्या. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळं आजच्या (1 जून) परीक्षा मुंबई विद्यापीठाकडून पुढं ढकलण्यात आल्यात. आज बीएमएस (5 वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र 2 ची एक परीक्षा आणि अभियांत्रिकी शाखेची सत्र 8 ची एक परीक्षा अशा दोन परीक्षा होणार होत्या. मात्र, मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळं या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच आता या परीक्षा 1 जून ऐवजी 8 जून रोजी होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी (31 मे ) मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या एकूण 43 परीक्षा पार पडल्या.
कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर : दुसरीकडं मेगा ब्लॉकमुळं मुंबई विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, महिन्याच्या पहिल्या शनिवारी सुट्टी मिळाल्यामुळं जून महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येणं अनिवार्य असणार आहे.
हेही वाचा -
- मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा फटका रस्ते वाहतुकीला; आगीतून फुफाट्यात पडल्याची प्रवाशांची अवस्था - Mumbai Mega Block
- मुंबईला जाताय तर थांबा! 'ही' बातमी न वाचता मुंबईला जाण्याचं नियोजन केल्यास होऊ शकते अडचण - Mega Block
- मुंबईकरांचे 'मेगा'हाल; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन - Central Railway Jumbo Mega Block