मुंबई Train Stunt viral video : स्टंटबाजीच्या नादात मुंबईत राहणाऱ्या एका तरुणाला जन्माची चांगलीच अद्दल घडली आहे. चालत्या ट्रेनमध्ये धोकादायक स्टंट करताना खाली पडल्यामुळं तरुणाला हात आणि पाय गमवावा लागलाय. स्टंटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. तरुण लोकल ट्रेनमध्ये चढताना भरधाव वेगात असलेल्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. फरहद शेख असं या तरुणाचं नाव आहे.
व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल : 14 जुलै रोजी फरहद शेख हा रेल्वे स्थानकात स्टंट करत होता. या तरुणानं चालत्या लोकल ट्रेनच्या दरवाजाला पकडत प्लॅटफॉर्मवर पायानं घसरत तो स्टंट करत होता. तरुणाचा हा प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधीही या तरुणानं मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात देखील स्टंट केले आहेत.
व्हिडिओला लाईक्स मिळावे म्हणून स्टंटबाजी : फरहद आजम शेख हा अँटॉप हिल वडाळी येथील असल्याचं समोर आलं आहे. चौकशीनंतर फरहदनं सांगितलं की, "आपल्या व्हिडिओला सोशल मीडियावर जास्त लाईक्स मिळावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये स्टंट केला. व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्या मित्रानं मला सहकार्य केलं." मात्र, या धोकादायक स्टंटबाजीमुळं त्याला एक हात आणि एक पाय गमावावा लागलाय.
रेल्वेकडून आवाहन : रेल्वे किंवा प्लॅटफॉर्मवर कोणीही स्टंटबाजी करू नये. स्टंटबाजी कोणी करत असेल तर 9004410735 या क्रमांकावर किंवा 139 क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असं आवाहन रेल्वेकडून व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
हेही वाचा