मुंबई Mumbai High Court On Mahant Ramgiri Maharaj : महंत रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाका, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिलाय. मोहम्मद पैगंबरांबाबत चुकीचं विधान केल्याचा आरोप रामगिरी महाराजांवर करण्यात आलाय. महंत रामगिरी यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमुळे राज्यात तणाव वाढू शकतो. त्यामुळं ते व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवावेत, अशी विनंती वकील एजाज नख्वी यांनी खंडपीठासमोर केली.
गरज भासल्यास सायबर सेलची मदत : न्यायालयानेच गुन्हा नोंदवून हे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अमिन इद्रीसी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. रामगिरी महाराजांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील एजाज नख्वी यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयानं हे व्हिडिओ तात्काळ हटवण्याचा आदेश दिला असून हे व्हिडिओ हटवण्यासाठी गरज भासल्यास सायबर सेलची मदत घ्यावी, तसेच रामगिरी यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या विविध तक्रारींचा तपास करावा, असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले.
अटक करण्याचा निर्णय पोलिसांकडे : रामगिरी महाराज यांच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे, त्यामुळं या प्रकरणात त्यांना अटक करायची की नाही? याचा निर्णय पोलिस घेतील. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत न्यायालयानं हे प्रकरण राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं, असं स्पष्ट केलं.
रामगिरी महाराज यांच्या विधानामुळं मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून मुस्लिम समाज संतप्त झाला, असल्याचं नख्वी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. महंत रामगिरी यांच्यावर राज्याच्या विविध भागात गुन्हे दाखल आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, याकडेही त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं.
58 ठिकाणी गुन्हे दाखल : रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यात 58 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. सर्व गुन्हे एकत्रित करुन सिन्नर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेत, अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी खंडपीठाला दिली. याप्रकरणी दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं.
हेही वाचा