मुंबई- देशाच्या आर्थिक राजधानीत आगीची भीषण दुर्घटना घडली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. यात 7 वर्षे आणि 10 वर्षे वयाच्या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
मुंबईत सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाचं वातावरण आहे. अशातच चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरातील एका इमारतीला आग लागली. दुर्घटनेतील सातही मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज- याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धार्थ कॉलनी परिसरातील एका इमारतीला आग लागली. ही घटना पहाटे साडेपाच वाजता उजेडात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी अग्निशमन विभागाला संबंधित घटनेची माहिती देणारा फोन आला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. ही आग लेव्हल वन प्रकारातील असून दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
निवासी मजलादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी- अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील ए एम गायकवाड मार्ग येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानाला ही आग लागली. ही आग सुरुवातीला मर्यादित होती. मात्र, इलेक्ट्रिक वायरिंग आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, घरगुती वस्तू या आगीच्या संपर्कात आल्यानं ही आग वाढली. आगीच्या भक्षस्थानी आलेली संबंधित इमारत दुमजली आहे. तळमजला अधिक वरचा मजला अशा स्वरूपाचं या इमारतीचे बांधकाम आहे. यातील तळमजल्यावर दुकान असून, वरचा वाजला निवासी म्हणून वापरला जातो. ही आग वाढल्यानं निवासी मजलादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी आला.
एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू- बचाव कार्यानंतर इमारतीतील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यांना राजावाडी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारदरम्यान डॉक्टरांनी सर्व पाचही जखमींना मृत घोषित केल्याची माहिती पालिकेनं दिली. पॅरिस गुप्ता या सात वर्षाच्या मुलीचा आणि नरेंद्र गुप्ता या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत मृत्यू झाला. 39 वर्षीय अनिता गुप्ता आणि 30 वर्षीय मंजु गुप्ता या दोन महिलांसह 30 वर्षीय प्रेम गुप्ताचा आगीत मृत्यू झाला.