मुंबई Mumbai Cyber Crime : पोलिसांप्रमाणे बँक अधिकारी अनेकदा ग्राहकांना सायबर भुरट्यांपासून सावध राहण्याचं आवाहन करत असतात. तसंच अनोळखी व्यक्तींनी बॅंकेचं नाव सांगत जर आपल्याला आपला आधार क्रमांक अथवा कोणतीही वैयक्तिक माहिती विचारली तर ती सांगू नये असंही बॅंकेकडून सांगितलं जातं. मात्र, असं असूनही थेट एका बँकेच्या अधिकाऱ्यालाच सायबर क्राईम गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात अडकवल्याची घटना मुंबईत घडली आहे. त्यामुळं बँकेचे अधिकारीच सुरक्षेच्या दृष्टीनं सतर्क नसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात भारतीय दंड संविधान कलम 419, 420 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 ड, 66 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
काय आहे प्रकरण? : पारिजाद मछलीवाला (वय 48) असं तक्रारदार महिलेचं नाव असून त्या गोरेगाव येथील सिटी बँकेत सीनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. मछलीवाला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 22 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या आसपास त्यांना एका अज्ञात नंबरवरुन कॉल आला. कॉल उचलल्यावर समोरून फेडेक्स (FEDEX) या कुरिअर कंपनीचा रेकॉर्डेड मेसेज चालू झाला. त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की, त्यांना पारिजाद यांच्या नावानं कुरिअर मिळालं असून त्यामध्ये काहितरी त्रुटी आहेत. त्यानंतर तो कॉल माही शर्मा नामक महिलेशी कनेक्ट झाला. त्या महिलेनं पारिजाद यांना त्यांच्या नावानं तैवानला पाठवण्यात आलेलं पार्सल आम्हाला मिळाल्याचं सांगितलं. मात्र, असं कोणतंही पार्सल न पाठवल्यामुळं पारिजाद यांना यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर सदरील महिलेनं आम्हाला पार्सलमधून तुमचं आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, 140 ग्राम MDMA तसंच इतर वस्तू सापडल्याचं सांगितलं. हे ऐकून पारिजाद काहीशा घाबरल्या. तसंच त्यांनी हे पार्सल आपलं नसल्याचं सागितलं.
महिला बँक अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा : त्यानंतर सदरील महिलेनं पारिजाद यांच्याकडून त्यांचा आधार क्रमांक घेतला. तसंच तुमचं आधारकार्ड अवैधरित्या वापरण्यात आल्याचं सांगत मुंबई क्राईम ब्रांच यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हा कॉल सबइन्स्पेक्टर विक्रम सिंग यांना ट्रान्सफर करण्यात येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर समोरील व्यक्तीनं पारिजाद यांना 'स्काईप' अॅप डाउनलोड करायला लावलं. या अॅपमध्ये टाकण्यासाठी त्यानं एक नंबर दिला आणि त्यानंतर लगेल मुंबई क्राईम ब्रांच (MUMBAI CRIME BRANCH) असा चॅटबॉक्स ओपन झाला. त्यानंतर चालू कॉल कट झाला आणि त्यांना स्काईपवर व्हिडिओ कॉल आला. मात्र, व्हिडिओ कॉलमध्ये केवळ पारिजाद यांचाच चेहरा दिसत होता. त्यानंतर संभाषणादरम्यान पारिजाद यांच्याकडून त्यांचं आधारकार्ड, फोटो, तसंच एच.एस.बी.सी आणि एच.डी.एफ.सी या बँकेची सर्व माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे आधारकार्ड इतर ठिकाणी अवैध कारणांसाठी वापरण्यात येत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी 4 लाख 53 हजार 342 रुपये पाठविण्यास सांगितले. हे पैसे तपासानंतर 30 मिनिटांनी परत बँक खात्यावर जमा होतील, असं सांगण्यात आलं. अशाप्रकारे सायबर भुरट्यांनी महिला बँक अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा घातला आहे.
हेही वाचा -