मुंबई Mumbai Crime News : साकीनाका परिसरात एका व्यक्तीनं पाच जणांवर चाकूनं वार केल्याची घटना उघडकीस आलीय. कुर्ला पश्चिमेकडील जरीमरी परिसरात गुरुवारी रात्री गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याठिकाणी पाच जण चाकू हल्ल्यात जखमी झाले. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी विवध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. याप्रकरणी आरोपी इन्कलाब खान याला अटक करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिलीय. तर जावेद, कैकशा खान आणि अजहर खान हे आरोपी फरार आहेत.
पाच जणांवर हल्ला : साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये सिद्धेश प्रकाश घोरपडे (23), राजेश थंगराज चेटियार (28), थंगराज चेट्टियार (58), लक्ष्मी चेटियार (52) आणि विकास (30) यांचा समावेश आहे. यातील लक्ष्मी चेटियार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर थंगराज आयसीयूमध्ये आहे. सर्व जखमी कुर्ला पश्चिमेतील जरीमरी येथील आंबेडकर नगर परिसरातील राहणारे आहेत. इन्कलाब खान (50) असं हल्लेखोराचं नाव आहे. त्यानं चाकूनं हल्ला करत पाच जणांना जखमी केलं. त्यानंतर त्यानं त्याच शस्त्रानं स्वतःवर वार केले. यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. खान यांच्यावर ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांसह अनेक आरोप आहेत. या घटनेनं घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल आणि साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोराला अटक करण्याची मागणी करत पीडितांच्या नातेवाईकांचा जमाव जमला होता. अखेर पोलिसांनी संशयिताला राजावाडी रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
क्षुल्लक कारणावरुन वाद : जखमी राजेश चेटियार यांची पार्किंगच्या मुद्द्यावरुन आरोपी इन्कलाब खानशी शाब्दिक बाचाबाची झाली. यात आरोपी खाननं चेटियारला शिवीगाळ केली. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केला. परंतु खाननं अंदाधुंद हल्ला करण्यास सुरुवात केली. यात राजेश चेटियार यांच्या डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली, तर त्याचा मित्र प्रकाश घोरपडे याच्या छातीला दुखापत झाली. दुसरा मित्र विकास याच्या पोटात चाकू मारण्यात आला. या प्रकरणी राजेश चेटियार यांच्या तक्रारीवरुन इन्कलाब खान, जावेद, कैकशा खान आणि अझहर खान यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 323, 324, 326, 504, 506 आणि 34 अंतर्गत साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
हेही वाचा :