मुंबई Mumbai Crime News : कामावरुन घरी जाणार्या एका 45 वर्षीय व्यावसायिकाचं दोन अज्ञात व्यक्तींनी 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपहरण, खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
तिघांना अटक : यासंदर्भात अधिक माहिती देताना समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांनी माहिती दिली की, ''कांदिवली येथे एका 45 वर्षीय व्यावसायिकाचं त्याच्या कार चालकासह पाच कोटींच्या खंडणीसाठी दोन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं. तसंच 60 लाख रुपये खंडणीची रक्कम दिल्यानंतर या व्यावसायिकासह त्याच्या कारचालकाची सुटका करण्यात आली. मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास त्यांच्यासह पत्नी आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं व्यावसायिकानं हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर चार दिवसानंतर त्यांनी समता नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली." या तक्रारीनंतर 13 मे रोजी समता नगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 323, 34, 354 अ, 386, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सागर पवार (वय 36), किरण भोसले (वय 34) आणि मंगेश कारंडे (वय 35) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण? : तक्रारदार व्यावसायिक बोरिवली परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत राहतात. बुधवारी 8 मे रोजी ते त्यांच्या मित्राबरोबर काम संपवून अंधेरीतील कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा कारचालक देखील होता. रात्री नऊ वाजता ते कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सर्व्हिस रोडवर आले. तिथं त्यांचा मित्र कारमधून उतरला. यावेळी रेड सिग्नल असल्यानं त्यांची कार तिथेच थांबली होती.
कारचालकानं कार लॉक करण्यापूर्वीच तिथे दोन तरुण आले आणि ते दोघंही जबदस्तीनं कारमध्ये बसले. या दोघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना कार दहिसरच्या दिशेनं घेऊन जाण्यास सांगितलं. तसंच काही कळण्यापूर्वीच या दोघांनी त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडं पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली. पत्नी आणि दोन्ही मुलींना जिवंत पाहायचंय असेल तर पैसे द्यावे लागतील, असं धमकावत त्यांनी कुटुंबीयांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तक्रारदाराने पाच कोटी नसून आपण 20 लाखांची व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यामुळं चिडलेल्या एकानं त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांनी 60 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. ही रक्कम त्यांच्या घरी आल्याने त्यांनी त्यांना घराजवळ येण्याची विनंती केली. त्यामुळं ते सर्वजण त्यांच्या बोरिवलीतील घराजवळ आले. यावेळी तक्रारदारानं त्यांच्या पत्नीला फोन करुन बॅगेत 60 लाख रुपये भरुन त्यांच्या कारचालकास देण्यास सांगितलं.
काही वेळानंतर त्यांचा कारचालक त्यांच्या घरी गेला आणि त्यानं साठ लाख रुपये आणून त्यांना दिले. सुखरुप सुटका झाल्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसह दोन्ही मुलींना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकारामुळं ते प्रचंड मानसिक तणावात होते. अखेर कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी चार दिवसानंतर समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा -
- ६२ वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या आरोपीला बेड्या, पाच गुन्ह्यांची झाली उकल - Mumbai Crime News
- 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम 'या' अभिनेत्याची फसवणूक, शेअर गुंतवणुकीच्या बहाण्यानं सव्वा कोटीला गंडा - Actor Amar Upadhyay
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 'या' साथिदाराविरोधात लूक आउट नोटीस जारी - dola saleem