मुंबई Mumbai Crime News : मुंबईतील मालाड मालवणी परिसरात बेकायदेशीर क्लिनिक चालवत असलेल्या दोन बोगस डॉक्टरांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 12 नं कारवाई केलीय. मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी परवेज शेख याचा शोध घेत असताना मालाड येथील मालवणी परिसरातील बेकायदेशीर क्लिनिकचा भांडाफोड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिलीय.
बोकीयदेशीररित्या सुरु होतं क्लीनिक : मुलुंड पोलीस ठाण्यात 2023 मध्ये दाखल गुन्ह्यात एक आरोपी वॉन्टेड होता. या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी हा मालवणी परिसरात बोगस डॉक्टर म्हणून अजिज पॉली क्लीनिक नावानं हॉस्पिटल चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 12 ला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कक्ष 12 मधील पोलीस पथकानं महानगरपालिकेतील नॉर्थ विभागाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांची मदत घेऊन मालवणी परिसरातील अजिज पॉली क्लीनिक असलेल्या घटनास्थळी छापा टाकला. तेव्हा परवेज अब्दुल अजीज शेख हा कोणताही वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टर असल्याचं भासवून बेकायदेशीररित्या रुग्णांना इंजेक्शन आणि सलाईन देऊन फसवणूक करत असल्याचं आढळले. त्यानंतर बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल : या आरोपीकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय परवानगी नसल्याची माहिती असूनही त्याच्या पत्नीनं तिचं अजीज पॉली क्लीनिक दवाखाना चालवण्यास दिला. परवेजची पत्नीकडे बीयुएमएस ही पदवी आहे. मात्र, दवाखान्यात ठेवण्याची परवानगी नसलेली औषधे दवाखान्यात आढळली. ही औषधे त्यांच्या दवाखान्यात ठेवून महिलेचा पती परवेज शेख यांच्यामार्फत रुग्णांना दिल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय. या प्रकरणी परवेज शेख आणि त्याची पत्नी यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 419, 420, 34 सह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट कलम 33 अ, 33 ब, 35 (2), 36 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलं. पुढील कारवाई करता मालवणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात आरोपींना देण्यात आलंय. या आरोपी विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात 2021 तर मालवणी पोलीस ठाण्यात 2019 आणि 2020 मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे आरोपी परवेज सह त्याची 32 वर्षीय पत्नी यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात 2023 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा :