मुंबई Mumbai Crime News : पोलीस असल्याची बतावणी करून रिक्षा चालकाशी वाद घालून रिक्षा चालकाचं महागडं घड्याळ आणि ब्लू टूथ काढून घेतल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज परिसरात घडलीय. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव यांनी दिलीय. भरदिवसा ही घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
पोलीस असल्याचं सांगून रिक्षाचालकाला लुटलं : याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रिक्षाचालक एका ठिकाणी थांबला होता. त्यानंतर दोन जण आले आणि त्यांनी जबरदस्तीनं भांडण उकरुन काढलं. यानंतर तो रिक्षा चालक रिक्षानं आपल्या घरी जाऊ लागताना आरोपींनी ऑटो रिक्षा थांबवून त्याच्याकडील ऐवज लुटला. त्याच्या कानातील ब्लू टूथ आणि हातातलं महागडं घड्याळ आरोपींनी हिसकावून नेलं. विशेष म्हणजे यातील आरोपी स्वत: पोलीस असल्याचं सांगत त्यानं रिक्षा थांबवून रिक्षा चावलकाकडील ऐवज लुटला. यानंतर त्यानं आपला मोबाईल नंबर देऊन तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तक्रारदारानं त्याचा नंबर डायल करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्या फोनवर कोणताही प्रतिसाद आला नाही. यानंतर तक्रारदार रिक्षा चालकानं जुहू पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिलीय.
यापूर्वीही अशा अनेक घटना : मिळालेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात अशा घटना नेहमीच घडतात. याआधीही अशा प्रकारचं एक प्रकरण उघडकीस आलं होतं. याबाबत अनेक तक्रारी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. त्यात बस पकडण्यासाठी जाणाऱ्या एका व्यक्तीला मुद्दाम ढकलून लुटण्यात आलं होतं. ज्याचा तपास करुन नंतर आरोपीला अटकही करण्यात आली होती. असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होतेय.
हेही वाचा :
- स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 84 वर्षीय व्यक्तीला 9.40 कोटींचा गंडा; बँकेच्या माजी अधिकाऱ्याला अटक
- मुंबईत 8 पिस्तूलांसह 15 जिवंत काडतुसे जप्त, अटकेतील दोन आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू
- सोशल मीडियावर ओळख: तरुणासोबत नाईट आऊटला गेलेल्या तरुणीवर नराधमाचा अत्याचार, पोस्ट शेअर करुन मागितला न्याय