मुंबई : शिवडी परिसरात १९ वर्षीय तरुणीचा इमारतीच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. इमारतीच्या टेरेसवर तरुणी झोपली असताना हा अपघात झाला आहे. चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून झोपेत पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. कशिष कसबे (वय १९) असे या मृत तरुणीचे नाव आहे. शिवडी पोलिसांकडून अल्पवयीन प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाची पोलिसांनी बालसुधार गृहात रवानगी केली आहे.
शिवडी परिसरात बंद अवस्थेत आलेल्या एमटीएनल कंपनीच्या एका इमारतीवरून पडून सोमवारी सकाळी एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. झोपेत ही तरुणी पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याचा संशय असून शिवडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. कशिष कसबे ही शिवडीच्या टाटानगर झोपडपट्टी परिसरात तिच्या प्रियकरासोबत राहत होती.
रविवारी रात्री तरुणी तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत परिसरात असलेल्या एमटीएनल कंपनीच्या एका बंद गच्चीवर जाऊन झोपली होती. मात्र, झोपेत असताना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ती अचानक खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवला आहे. सुरुवातीला पोलिसानी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. मात्र, तरुणीच्या आईनं तक्रार दिल्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण लागलं.
टेरेसच्या पाचव्या मजल्यावरून पडली- याबाबत शिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कशिष कसबे ही झोपडपट्टीत पाणी येत असल्यानं एमटीएनएलच्या बंद इमारतीच्या टेरेसवर प्रियकरासह झोपली होती. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती थेट टेरेसच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली. खाली पडल्याचा आवाज आल्यानं लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी कशिषला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांकडून तरुणीला मृत घोषित करण्यात आलं.
शिवडी पोलिसांकडून तपास सुरू- मुलीच्या आईनं तक्रार केल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, "गेल्या चार दिवसांपासून हे जोडपे इमारतीत राहात होते. तिला रहिवाशांनी तातडीने रुग्णालयात नेले होते. आम्ही शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहोत." त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या प्रियकरानं तिला धक्काबुक्की केली असावी, असा आरोप मृत तरुणीच्या आईनं केला. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती शिवडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिली.
हेही वाचा-