मुंबई Mumbai Coastal Road Water Leakage : मुंबईतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कोस्टल रोडचं 11 मार्च रोजी लोकार्पण करण्यात आलं. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आला, मात्र दोन ते अडीच महिन्यातच आणि पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडला गळती लागल्याचं चित्र समोर आलंय. कोस्टल रोडच्या भिंतीच्या आतून पाणी झिरपू लागल्यानं कोस्टल रोड सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
मुख्यमंत्री शिंदे घेणार आढावा बैठक : अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र त्यापूर्वीच कोस्टल रोडच्या भिंतीतून आणि छतातून पाणी गळायला सुरुवात झाली. कोस्टल रोडच्या बोगद्यात होत असलेल्या गळतीमुळं कोस्टल रोडच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. तसंच वाहतूकदारांसाठी कोस्टल रोड सुरक्षित आहे का? असा सवालदेखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. दरम्यान, आज (28 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्सूनपूर्व आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळं या बैठकीत कोस्टल रोड संदर्भात ते काय निर्णय घेतील, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कोस्टल रोड सुरक्षित? : यावर्षी मुंबईत अधिक पाऊस पडला नाही. मात्र, समुद्रातून मरीन ड्राईव्ह ते वरळी या बोगद्याच्या आतमध्ये पाणी झिरपत असल्यामुळं कोस्टल रोड हा धोकादायक ठरू शकतो. तसंच येथे दुर्घटनाही घडू शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. परंतु असं असताना दुसरीकडं मात्र कोस्टल रोड सुरक्षित असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलंय.
नव्या वादाला तोंड फुटणार? : कोस्टल रोड हा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असून, मुंबईकरांच्या जीवनात नवीन बदल घडवून येईल, असं वक्तव्य कोस्टल रोडच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. तर कोस्टल रोड हे आमचं स्वप्न असल्याचं अनेकदा आदित्य ठाकरे म्हणालेत. दरम्यान, त्यावेळी कोस्टल रोडच्या कामावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई होताना दिसली होती. परंतु, त्यानंतर आता अवघ्या दोन ते तीन महिन्यातच कोस्टल रोडला लागलेल्या गळतीमुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसंच कोस्टल रोडच्या गळतीमुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. त्यामुळं या मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात.
हेही वाचा -
- 'बिग'बींच्या ट्विटनंतर कोस्टल रोडवरुन श्रेयवादाची लढाई, भाजप-ठाकरे गटात जुंपली - Coastal Road
- कोस्टल रोडवरून जाताना वेगावर ठेवा नियंत्रण, पहिल्या अपघातात सुदैवानं वाचला चालक - coastal road first accident
- मुंबईत विकास प्रकल्पासाठी सहा वर्षांत तब्बल 21,028 झाडांची कत्तल; 'झाडे लावा झाडे जगवा' चा नारा केवळ कागदा पुरताच? - BMC