मुंबई Heavy Rain Hit Flights : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळं मुंबई, पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळं राज्यातील विविध जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली. या पावसाचा जास्त फटका हा रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीला बसला आहे.
उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना फटका : मोठ्या प्रमाणात कोसळत असलेल्या पावसामुळं अनेक हवाई वाहतूक कंपन्यांच्या विमान उड्डाणाला विलंब झाला. काही कंपन्यांनी त्यांची उड्डाणे रद्द केली. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने व प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वेळेत विमानतळावर पोहोचणे अशक्य झाले. विमान कंपन्यांनी देखील सुरक्षिततेला प्राधान्य देत खराब हवामानामुळे काही उड्डाणे रद्द केली. सतत सुरु असलेल्या पावसामुळे, वेगवान वारे व कमी दृश्यमानतेमुळे उड्डाणांना, विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी विलंब होत होता. सावधगिरीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली.
#6ETravelAdvisory: Continuous and heavy rains over #Mumbai are causing periodic delays in flight schedules. While we strive to give you real-time updates, we kindly ask you to check your flight status before leaving for the airport.
— IndiGo (@IndiGo6E) July 25, 2024
प्रवाशांना परतावा मिळणार : काही विमानांनी मुंबई विमानतळावरील प्रस्तावित लँडिंग रद्द करुन जवळच्या विमानतळाकडे त्यांचा मार्ग वळवण्यात आला होता. एअर इंडियाकडून प्रवाशांना परतावा दिला जाणार आहे. ज्या प्रवाशांचे 25 जुलैचे निश्चित तिकीट होते अशा प्रवाशांना एअर इंडियाने तिकीटाचा परतावा देण्यात येईल, असे जाहीर केले.
#ImportantUpdate: Heavy rains in Mumbai are affecting flight operations and resulting in cancellation and diversion of some of our flights. Air India is offering full refunds or a one-time complimentary rescheduling for bookings confirmed for travel on 25th July 2024.
— Air India (@airindia) July 25, 2024
Please…
विमानतळाकडे निघण्यापूर्वी उड्डाणाची अद्ययावत माहिती घ्या : रस्ते वाहतुकीला होत असलेला विलंब, विविध ठिकाणी भरलेले पाणी व इतर अपरिहार्य बाबींचा विचार करुन विमानतळाकडे प्रवासासाठी निघण्यापूर्वी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागेल हे लक्षात घेऊन, पुरेसा वेळ हातात ठेवून प्रवासाचे नियोजन करा, उड्डाणाची अद्ययावत स्थिती तपासून घराबाहेर निघा, असे आवाहन 'इंडिगो'तर्फे प्रवाशांना करण्यात आले.
विमानांना होतोय विलंब : सकाळी सुमारे अर्धा तास अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. रात्री 8.45 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या विमानांपैकी 360 विमानांना विलंब झाला होता. विलंब कालावधी सरासरी 56 मिनिटांचा होता. तसंच मुसळधार पावसामुळं धावपट्टीचा वापर बंद ठेवण्यात आला होता. तर मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या विमानांपैकी 287 विमानांना विलंब झाला. हा विलंब कालावधी सरासरी 32 मिनिटांचा होता.
प्रवाशांना मनस्ताप : मुंबई विमानतळावर उतरणारी 5 विमाने व उड्डाण करणारी 8 विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसंच मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीकडून पुरेशी माहिती वेळेवर मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.
हेही वाचा - कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडले, ११०५० क्युसेक्स पाणी सोडलं - Koyna Dam Satara