मुंबई Mumbai Airport Closed for 6 Hours : मुंबई विमानतळावर आज (9 मे) विमानांचं लँडिंग आणि टेकऑफ सुमारे 6 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ प्राधिकरणानं याबाबत सांगितलंय की, पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज 6 तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या विमानतळावरून दररोज 850 हून अधिक विमानं ये-जा करतात. तर गर्दीच्या हंगामात यांची संख्या 1 हजार उड्डाणांपर्यंत जाते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मान्सून पूर्वतयारी उपाययोजना अंतर्गत, दोन्ही धावपट्ट्या - RWY 09/27 आणि RWY 14/32 मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज तात्पुरत्या 6 तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या कालावधीत तेथे दुरुस्तीचं काम सुरू राहणार असल्याचं विमानतळ प्राधिकरणानं म्हटलंय. आज 9 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळाच्या धावपट्ट्या बंद राहतील. त्यानंतर विमानतळावरील विमानांचं कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू होईल.
नेमकं धावपट्टीवर काय होते काम? प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विमानतळावर विमानांचे सतत संचालन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी धावपट्टी तात्पुरती बंद करून दुरुस्तीचं काम केलं जातं. धावपट्टीच्या देखभालीमध्ये तज्ञांचा समावेश असतो. हे मायक्रोटेक्चर आणि मॅक्रोटेक्चर झीज होण्यासाठी धावपट्टीच्या पृष्ठभागाची बारकाईनं तपासणी करतात आणि दैनंदिन कामकाजामुळं धावपट्टी खराब होणार नाही, याची खात्री करतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभालीची योजना विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांसह अनेक भागधारकांच्या सहकार्यानं तयार करण्यात आली आहे.
कशासाठी धावपट्टीवर काम होते?पावसाळ्यात होणारे अपघात टाळता यावेत, यासाठी मुंबई विमानतळाच्या देखभालीचं काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येत आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं ईटीव्हीशी बोलताना म्हटलंय की, या संदर्भातील माहितीपत्रक आम्ही एक महिन्यापूर्वीच जाहीर केलं होतं. तसंच ज्या विमान वाहतूक कंपन्या आहेत. त्यांना आम्ही या संदर्भातील सूचना तीन महिन्यापूर्वीच देतो. त्यानुसार या कंपन्या ज्या दिवशी मान्सून पूर्व काम होणार असतं त्या दिवसाचं बुकिंग घेत नाहीत. या कामासाठी विमानतळ पूर्णपणे बंद असतं. या काळात एकही विमान धावपट्टीवर उतरत नाही किंवा उड्डाण करत नाही.
हेही वाचा -