पुणे Shrikant Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस काल (4 फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातील नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे आता खळबळ उडाली आहे.
हेमंत दाभेकर शरद मोहोळचा साथीदार : गुंड हेमंत दाभेकर यानं काल वर्षा निवासस्थानी जाऊन श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. हेमंत दाभेकर हा पुण्यात नुकतीच हत्या झालेला कुख्यात गुंड शरद मोहळचा साथीदार आहे. गुंड किशोर मारणे याच्या खून प्रकरणामध्ये शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो सध्या जामीनावर बाहेर आहे. आता त्यानं खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी : या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, हेमंत दाभेकरला वर्षा निवासस्थानी घेऊन जाणारे युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्यात एकीकडे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचं प्रकरण पेटत असताना, गुंड हेमंत दाभेकर यानं खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
संजय राऊतांची टीका : खासदार संजय राऊत यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करत सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचं इतकं बळ का वाढलं? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचं अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत", असं संजय राऊत म्हणाले.
हे वाचलंत का :