मुंबई Sanjay Raut on Eknath Shinde : धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर लाँच सोहळा शनिवारी पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आपण विचारांची लढाई लढलो आणि हिंदुत्वासाठी उठाव केला." एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.
काय म्हणाले संजय राऊत? : संजय राऊत म्हणाले की, "आज गुरुपौर्णिमेसारखा पवित्र दिवस आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे यांना मी वंदन करतो. बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं, महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्रात लाखो स्वाभिमानी कार्यकर्ते घडवले आणि त्यांच्या स्वाभिमानाची ज्योत फुलवली, जगण्यातील स्वाभिमान शिकवला. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केलेली आहे. गद्दार लोक बाळासाहेबांना, आनंद दिघेंना गुरु मानत असतील तर तो त्यांचा अपमान आहे. त्यामुळं ते बाळासाहेबांचे शिष्य नाही होऊ शकत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा गुरु म्हणून फोटो वापरू नये. आमच्यातील काही नासके आंबे निघून गेले."
दिघेंचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : 'धर्मवीर 2' चित्रपटाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "चित्रपटामध्ये आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात या आगीत तुम्ही होरपळून जाल. आनंद दिघे यांचे हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व कसे होते हे सर्वांना माहित आहे. आनंद दिघे बाळासाहेबांना आपले गुरु मानायचे. बाळासाहेबांचा शब्द त्यांनी कधीही खाली पडू दिला नाही. मात्र, तुम्ही केलेली गद्दारी, बेईमानी लपवण्यासाठी आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करत आहात. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी असे चित्रपट काढत आहात. चित्रपट वगैरे हे सगळं बोगस, भंपक आहे."
आम्ही जर चित्रपट काढले तर... : "धर्मवीर चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचं चित्र दाखवलं जात आहे. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय संबंध होते? दिघे साहेब त्यांना काय वागणूक देत होते? हे आम्हालाही चांगलंच ठाऊक आहे. आम्ही जर चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवून बसावं लागेल." असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
गृहमंत्री अमित शाहांना टोला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे पुण्यात एक दिवसीय अधिवेशन होत आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाहा पुण्यात आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत. मणिपूर अजून धूमसत आहे. तिकडची आग अजून शांत झाली नाही. गृहमंत्र्यांनी तिकडे जावं आणि देशात शांतता प्रस्थापित करावी. जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं."
हेही वाचा
- 'कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित 'धर्मवीर 2' चा ट्रेलर प्रदर्शित, फडणवीसांनाही काढायचाय सिनेमा - Dharmaveer 2 Trailer
- उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार 'गिफ्ट'; अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यात उपक्रम - Uddhav Thackeray Birthday
- 'डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट मालाचं आकर्षण...' - संजय राऊत - Shivaji Maharaj Waghnakh