मुंबई Monsoon Update : सध्या मुंबईसह राज्यातील विविध भागात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. उकाडा आणि गर्मीमुळं सगळेच त्रस्त झालेत. मुंबईत देखील 40 अंश सेल्सिअसवर तापमान असून, यामुळं अंगाची लाहीलाही होत आहे. या गर्मीतून, उकाड्यापासून कधी सुटका होऊन पाऊस कधी पडतोय, याची सर्वजण वाट बघत आहेत. केरळात मान्सून (Monsoon News) दाखल झाल्यानंतर आता मुंबई आणि महाराष्ट्रातही लवकरच मान्सून दाखल होणार आहे, असं मुंबई हवामान विभागातील हवामान तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी? : महाराष्ट्रसह देशातील अन्य राज्यातही सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. माणसांप्रमाणं मुक्या जनावरांना या तापमानाची झळ बसत आहे. राजधानी दिल्लीत सर्वाधिक तापमानाची दोन दिवसांपूर्वी नोंद झाली आहे. तर राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर भागातही मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्याचं चित्र आहे. दोनच दिवसांपूर्वी केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी येणार? याची बळीराजा आतुरतेनं वाट पाहात आहे. परंतु महाराष्ट्रात सात ते दहा जून या कालावधीत मान्सून दाखल होईल, असं मुंबई हवामान विभागातील हवामान तज्ञ सुषमा नायर यांनी “ईटीव्ही भारत”शी बोलताना सांगितलंय.
पाणी कपातीचं संकट : दुसरीकडं मागील वर्षी पाऊस कमी पडल्यामुळं राज्यातील धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला नव्हता. यामुळं सध्या राज्यातील पाणीसाठा संपत आल्यामुळं आगामी काळात पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर सध्या राज्यातील काही गाव-खेड्यात टँकरनं पाणीपुरवठा केला जात असून, मुंबईकरांवर देखील पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठी कमी होत चालल्यामुळं, पाच जूननंतर पाणी कपातीचा निर्णय पालिका प्रशासन घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडं पाणी जपून वापरण्याचं आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -