सोलापूर Mohite Patil : माढा मतदारसंघ हा लोकसभा निवडणूक लागल्यापासूनच चर्चेत राहिला आहे. सुरुवातीला मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेसाठी उमेदवारी पक्षाकडे मागितल्यानेच या मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडेच लक्ष लागले होते; मात्र भाजपाची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेतून उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील गट नाराज झाला होता. कार्यकर्त्यांच्या दबावापोटी मोहिते पाटील यांना निर्णय घ्यावा लागत असल्याचीही चर्चा माढा मतदारसंघांमध्ये दिसून येत होती. आज रविवारी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती याविषयी अनेक राजकीय खलबते झाली. या बैठकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोधी गटातील सर्व नेते एकवटले होते. त्यामध्ये मोहिते पाटील यांनी निर्णय घेण्यावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवरत्न बंगल्यावरती बैठक : आज शिवरत्न बंगल्यावरती झालेल्या बैठकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकी मागे शरद पवार हेच असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मोहिते पाटील घराण्याला सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठं स्थान आहे. 2019 च्या लोकसभेमध्ये मोहिते पाटील यांनी भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस मतदारसंघातून तब्बल एक लाखांचे मताधिक्य देऊन विजयी केले होते; मात्र 2024 च्या लोकसभेमध्ये भाजपाने मोहिते पाटील यांना डावल्याने ते नाराज झाले आहेत.
जयंत पाटील यांचे संकेत : लाखाचे मताधिक्य देऊन निवडून आणणारे मोहिते पाटील भाजपाच्या उमेदवारचा प्रचार करणार की, इतर पक्षातून निवडणूक लढवणार याकडेच सध्या सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक दिग्गज नेते आज या बैठकीला उपस्थित असले तरी रामराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही फक्त विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो आहोत. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पुढील दहा दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतील असे संकेत माध्यमांशी बोलताना दिले आहेत.
मोहिते पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न: आज दुपारपासूनच मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती विविध राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच भाजपाचे गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती पोहोचले. ते मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी कार्यकर्त्यांनी 'धैर्यशील भैया आगे बढो हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा देत शिवरत्नचा परिसर दणाणून सोडला आहे.
हेही वाचा :