मुंबई Narendra Modi - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जाताहेत. महाराष्ट्रात आपणच कसं चांगलं काम करू शकतो. हे दाखवण्याचा दोन्हींकडून प्रयत्न होत आहे. महाविकास आघाडीने अडीच वर्ष कसं चांगलं काम केलं याबाबत मविआतील नेते सांगताना दिसताहेत. तर महायुती सरकारनं अनेक लोककल्याणकारी महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' कशी महिलांसाठी चांगली आहे, याचा पाढा महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने वाचला जात आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 च्यावर महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येताहेत. विविध पायाभूत सुविधा यांच्या उद्घाटनासाठी मोदी महाराष्ट्र येताहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सतत महाराष्ट्रात येऊन, महायुती सरकारनं जनतेसाठी विविध विकासकामं केली आहेत. असं सांगत मोदी एक प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताहेत. मोदींचे हे महाराष्ट्रातील दौरे हा विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा एक भाग असल्याचं सुद्धा बोललं जातय. मोदी महाराष्ट्रात येऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताहेत.
मोदींची जादू चालेल? - लोकसभा निवडणूक प्रचारात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्या महाराष्ट्रात 18 पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या. यावेळी केंद्र सरकारनं गरीब, महिला, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, कष्टकरी आणि दलित यांच्यासाठी कशी विविध कामं केली आणि विविध योजनांच्या माध्यमातून या घटकांचं कसं सक्षमीकरण केलं. याचा प्रत्येक सभेतून पाढा वाचत होते. परंतु लोकसभा निवडणुकीत याचा फारसा फायदा महायुतीला झाल्याचं दिसला नाही. राज्यात महायुतीला जनतेनं स्पष्ट नाकारलं. तर महाविकास आघाडीला लोकांनी भरभरून मतं दिली. राज्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. केंद्रातील नेतेही महाराष्ट्राच्या मदतीसाठी आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, जे पी नड्डा आदी नेत्यांनी महाराष्ट्रात महायुतीचा प्रचार केला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कुठल्याही केंद्रातील नेत्याला मतदारांवर प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळं आता विधानसभा निवडणूकीपूर्वी मोदी महाराष्ट्र दौरे करताहेत आणि महायुती सरकार कसे लोक कल्याणकारी आणि विकासकामं करत आहे, हे जरी सांगत असले तरी ते मतदारांच्यावर प्रभाव पाडू शकतील का? मोदींची महाराष्ट्रात जादू चालेल का? हे मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल.
मोदींचा उपयोग होणार नाही - 2014 पूर्वी देशात महागाई आणि बेरोजगारी कमी होती. परंतु 2014 नंतर मोदी सत्तेत आल्यानंतर महागाई वाढली. बेरोजगारी वाढली. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये देऊ असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. हे आश्वासन अद्यापर्यंत पूर्ण केलं नाही. भाजपा आणि मोदी फक्त जनतेला आश्वासन देताहेत. पण त्याची पूर्तता करत नाहीत. मोदींनी लोकसभा निवडणुकीत अनेक सभा महाराष्ट्रात घेतल्या. परंतु जनतेनं त्यांना नाकारलं. मोदींच्या सभांचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही. उलट महाविकास आघाडीला लोकांनी स्वीकारलं आणि आताही विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर मोदी वारंवार महाराष्ट्र दौरा करताहेत. त्याचाही काहीच फायदा होणार नाही. हे फक्त आश्वासन देतात, फोडाफोडीचं राजकारण आणि कुरघोडीचं राजकारण करताहेत. हे लोकांना आता चांगलं कळलं आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यामुळं मोदी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कितीही सभा घेऊ देत. त्याचा काही फायदा होणार नाही. असं शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे.
नक्कीच फायदा होईल - लोकसभा निवडणुकीत मोदींनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या होत्या हे मान्य आहे. पण त्यावेळी विरोधकांनी संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, असा फेक नेरिटीव्ह तयार केला होता. यात ते यशस्वी ठरले आणि लोकांनी त्यांना मतदान केलं. त्यावेळी महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु त्यांचा लोकसभा निवडणुकीत फेक नेरिटीव्ह होता. हे आता मतदारांना आणि जनतेला समजलं आहे. मोदी हे विकासपुरुष आहेत. देशपातळीवर त्यांनी अनेक विकासकामं केली आहेत. जगभरात भारताचं नाव त्यांनी उंचावलं आहे. आता विधानसभा निवडणुकीत ते महाराष्ट्र दौरे करताहेत. अनेक पायाभूत सुविधांचं उद्घाटन करताहेत. हे बघून विरोधकांना वाईट वाटत आहे. मोदी महाराष्ट्रात येताहेत आणि कामांचा प्रचार करताहेत याचा नक्कीच फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत होईल. असा विश्वास भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केला.
हेही वाचा..