नाशिक - लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यात नाशिकमध्येही उमेदवार उभे करण्यात आले आहेत. मात्र महायुतीला अडचणीच्या ठरणाऱ्या काही जागांवर मनसे उमेदवारांना माघार घेण्याचा संदेश देण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली असून, मनसेचे उमेदवार अंकुश पवार यांनी आपला प्रचार थांबवला आहे. त्यामुळे या ठिकाणी मनसेच्या इंजिनला ब्रेक लागणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मनसेचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी नाशिकची ओळख होती. मात्र आता मनसेचा बालेकिल्ला ढासळला असून नाशिकवर मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरेंकडून आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अनेक उमेदवार घोषित केले. नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, इगतपुरी, देवळालीत मनसेकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मनसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अशात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजपाने पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर मनसेनेही मैत्री धर्म पाळत काही निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
...म्हणून प्रचार थांबवला - नाशिक मध्य मतदारसंघात भाजपाच्या आमदार देवयानी फरांदेंविरुद्ध महाविकास आघाडीचे वसंत गिते यांच्यात लढत होत आहे. अशात भाजपा आणि मनसेचा हिंदुत्वाचा अजेंडा असल्यानं मनसे उमेदवारामुळे भाजपाला दगाफटका होऊ नये यासाठी मनसे उमेदवार अंकुश पवार यांना माघारीचा निरोप पाठविण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवार पासून पवार यांनी आपला प्रचार थांबवला. पवार आता मुंबईत जाऊन राज ठाकरेंशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करतील असं नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
गिरीश महाजनांवर टीका - नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांचा सामना भाजपाचे राहुल ढिकले आणि शरद पवार गटाचे गणेश गिते यांच्याशी होणार आहे. मात्र प्रसाद सानप यांच्यावर सामाजिक दबाव येत असल्याचं समजतं. सानप यांची उमेदवारी येथे भाजपाला पूरक असून एका उमेदवारासाठी सानप यांच्या माघारीसाठी प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सानप यांनी मतदारांना एक व्हिडिओ पाठवून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरच टीका केली आहे. त्यामुळे सानप माघार घेतील का, याबाबत शशांकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा...