मुंबई Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरेंनी जाहीर केलं.
भाजपानं मानले आभार : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!" अशी पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेयर केलीय.
निवडणूक आगोगाला भरला दम : काय बोलणार? या वाक्यापासून राज ठाकरेंनी सभेला सुरुवात केली. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवल्यानं राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. यामध्ये प्रशासकीय कामातील लोकांना निवडणुकांच्या कामामध्ये गुंतवल्याने राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. दरम्यान, निवडणुका होत असताना निवडणूक आयोग निवडणुकीचं काम पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था का करत नाही? असं म्हणत, राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावलं. तसंच, प्रशासकीय कामातील कोणत्याही लोकांनी निवडणुकीच्या कामासाठी जाऊ नये. तुम्ही तुमचं काम पाहा, असं म्हणत तुम्हाला कोण नोकरीवरून काढून टाकतो हे मी बघतो, असा दमही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.
भाजपाच्या चिन्हाचा दिला होता प्रस्ताव : लोकसभेच्या जागा वाटपाची भाजपासोबत चर्चा झाली. मात्र, त्यांनी आपल्या चिन्हावर लढा असा प्रस्ताव ठेवल्याने तो आपण फेटाळला. कारण, मनसेला जे इंजिन चिन्ह मिळालं आहे ते माझ्या कार्यकर्त्यांमुळं मिळालं आहे. मी ते कदापीही सोडणार नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच, मुख्यमंत्री पदासाठी मी मोदींवर टीका केली नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली.
1995 पासून मी जागा वाटपाला कधी बसलो नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाल्यानंतर माध्यमांनी अनावश्यक बातम्या चालवल्या, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच 'मला असे वाटते' या मधळ्याखाली माध्यमांनी नको ते चालवलं, असा थेट आरोप त्यांनी केला. तसंच, राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशी बातमी चालवली. यावर बोलताना, राज ठाकरे म्हणाले, "असं काही करायच असतं तर तेव्हाच नसत का केलं. मी जन्माला घातलेलं जे मनसे अपत्य आहे, त्याचाचा मी प्रमुख असेन. दरम्यान, 1995 पासून मी जागा वाटपाला कधी बसलो नाही. त्यामध्ये ही जागा तू घे, ही मी घेतो असं मला चालत नाही. तसंच, यावेली जागा वाटपाची चर्चा नक्की झाली. त्यामध्ये भाजपाने प्रस्ताव ठेवला की आमच्या चिन्हावर लढा. परंतु, हे इंजिन चिन्ह तुम्हा म्हणजे कार्यकर्त्यांच्या कष्टाने मिळालं आहे. कुणाकडून फुकट मिळालं नाही."
मुख्यमंत्री पदासाठी मी टीका केली नाही : "माझा ज्या घरात जन्म झाला त्या घरात शिवसेनेचा जन्म झाला. नंतर भाजपा आणि शिवसेनेची युती झाली ती 1995 ला. त्यामुळे शिवसेनेनंतर माझे सर्वात जास्त संबंध आले असतील ते म्हणजे भाजपासोबत आले. तसंच, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासी कौटुंबिक संबंध आले. दरम्यान, प्रमोद महाजन यांचं निधन झालं. त्याचकाळात मी गुजरात दौरा केला. त्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीही चांगले संबंध निर्माण झाले. त्यावेळी देशातला एकमेव माणूस राज ठाकरे आहे जो सर्वात पहिल्यांदा म्हणाला होता की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत. परंतु, 2014 नंतर मोदींच्या धोरणांनी भ्रमनिरास झाला, त्यामुळे जे पटलं त्याला समर्थन दिलं आणि नाही पटलं त्याला विरोध केला," असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
1 मला जर शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर....; राज ठाकरेंनी थेटच सांगितलं - Raj Thackeray speech