सिंधुदुर्ग Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केलीय. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या दिशेनं कूच करावी लागल्याचं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय.
आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ खोटी : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ खोटी असल्याची शंका आमच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. मात्र, आरक्षण देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची आहे, असं देखील नाईक यांनी आज कुडाळमध्ये म्हटलंय.
उद्धव ठाकरेंवर अन्याय : उद्धव ठाकरेंवर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये वाढली आहे. उद्धव ठाकरे यांची जनता न्यायालय पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं मांडलेली बाजू मांडली. त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवसेनेवर अन्याय झाल्याची भावना वाढू लागली आहे, असं नाईक यांनी म्हटलंय.
नार्वेकरांनी दिलेला निर्णय चुकीचा : ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण, आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे. अशा कारवाईला आम्ही भीक घालत नाही, असं आमदार वैभव नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितलं. निधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चुकीच्या पद्धतीनं निर्णय दिला आहे. दिलेल्या निर्णयावरून लक्ष विचलित करण्यासाठी आमदार राजन साळवी, सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही लढाई आता महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. ही लढाई उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीही राहिलेली नाही. ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, अशी झाल्याचं नाईक यांनी म्हटलंय.
रवींद्र चव्हाणांना माझ्या शुभेच्छा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीला हजेरी लावली होती. त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रवींद्र चव्हाण यांना मिळाल्यास त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का :