मुंबई Sudhir Mungantiwar : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'नं खास संवाद साधला. यावेळी त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका, महाविकास आघाडीचा फेक नरेटिव्ह प्रचार, राज्य सरकारनं लागू केलेल्या विविध योजना, वाघनखांचा प्रवास, बदलापूर प्रकरणावर भाष्य केलं.
पोलिसांमुळं आपण सुरक्षित आहोत : "पोलिसांची बाजू घेण्याऐवजी बलात्काऱ्यांचं बिना फीचं वकिलीपत्र घ्यायचं, ज्या पोलिसांच्या अंगावर गेला, त्या पोलिसांना कटघऱ्यात उभं करायचं हे योग्य आहे का? हेच पोलीस तुमच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळं तुम्ही सुरक्षित आहात. अन्यथा तुमची किती वाईट अवस्था झाली असती," असं मत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं. "अफजल गुरूबद्दल यांनी (विरोधक) अशीच सहानुभूती दाखवली. कसाबबद्दल त्यांनी असंच प्रेम दाखवलं. आता बदलापूर प्रकरणातही पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी जे काही करायला पाहिजे, ते केलं. पण, आता बलात्काऱ्याच्या मृत्यूनंतर यांच्या डोळ्यात पाणी येतंय. खरंतर यांच्याबद्दल सहानुभूती वाटते," असा उपरोधिक टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला.
भाजपाला फटका बसणार? : राज्यातील आगामी निवडणुकीत विदर्भात भाजपाला फटका बसेल असं म्हटलं जातं. त्यावर विचारलं असता, "काँग्रेसनं खोटं बोलून सर्वकाही साध्य केलं. खरंतर ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा झाली तर काँग्रेस नुसतंच गोल्ड मेडल नाही तर त्या गोल्ड मेडलमध्ये हिऱ्याचं कोंदण लावून ते द्यावं लागेल. इतकं ते खोटं बोलतात. हे कितीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असले तरी, 'ये पब्लिक है सब जानती है'. त्यामुळं भाजपाला फटका काही बसणार नाही तर जनताच यांना झटका देईल. सरकार तो हमारीही आयेगी," असं मुनगंटीवार म्हणाले.
विशेष चित्रपटगृह सुरू करणार : "नागपूरची फिल्मसिटी उत्तम व्हावी, यासाठी काम सुरू झालंय. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे", अशी माहितीही सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. झाडीपट्टीची कला सर्वदूर जावी अशी इच्छा आहे. त्यासाठी काम सुरू असल्याचंही ते म्हणाले. ज्या चित्रपटांची 'अ' आणि 'ब' वर्ग चित्रपट म्हणून निवड होईल, त्या महिला दिग्दर्शिकांना पाच लाख रुपयांचं विशेष अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. रविंद्र नाट्य मंदिराचा परिसर आपण सुंदर करतोय. एवढंच नाही तर फक्त मराठी चित्रपटांसाठी तीन स्क्रिन असलेलं विशेष चित्रपटगृहही सुरू करतोय, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. नितीन देसाई यांची फिल्मसिटीही लिलावात घेण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : "सरकार नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभं असून, मराठी चित्रपटसृष्टीनं आता जागतिक झेप घ्यावी," असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. "निर्मात्यांना जिथं चित्रीकरण करायचंय तिथं त्यांना मोफत चित्रीकरण करता येणार आहे. उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहनत घेतलेली असते. पण कधी यश मिळतं तर कधी अपयशाला सामोरं जावं लागतं. मात्र त्यामुळे खचून जायचं नसतं," अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी' आणि 'सांस्कृतिक विकास मंडळा'मार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत आयोजित केलेला धनादेश वितरण कार्यक्रमात मंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी त्यांनी दादासाहेब फाळके, दादा कोंडके, रजनीकांत या दिग्ग्जांचीही उदाहरणं दिली.
हेही वाचा -
- पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारावर कृषी विभागाचे गंभीर शेरे; अधिकाऱ्यांना खडसावत मुनगंटीवारांनी दिल्या 'या' सूचना - Pik Vima Yojana
- "पंतप्रधान तर सोडा गृहमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ न शकल्यानेचं शरद पवारांची..." - Sudhir Mungantiwar
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरुन रणकंदन; सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांना सुनावलं, वाघनखं महाराजांचीच असल्याचा दावा - Monsoon Assembly Session 2024