नाशिक Chhagan Bhujbal Threat : धमकी येणं माझ्यासाठी नवीन नाही, याआधी मला अनेक धमक्या आल्या आहेत. मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र अशा कितीही धमक्या आल्या, तरी मी माझी भूमिका बदलणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावलं आहे. मंत्री छगन भुजबळ आज नाशिकला माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी : ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी आली आहे. त्यांना मिळालेल्या या पत्रात छगन भुजबळ यांच्या हत्येसाठी एक बैठक झाल्याचा उल्लेख आहे. या बैठकीला पाच जण उपस्थित होते. ही बैठक कुठं झाली, याची माहिती या पत्रात देण्यात आली आहे. तसंच वाहनांचे नंबर देण्यात आले आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांना हे पत्र दिलं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
धमकी येणं माझ्यासाठी नवीन नाही : मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे ही धमकी आल्याच्या प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिला. "धमकी येणं माझ्यासाठी नवीन नाही, याआधी मला अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र अशा कितीही धमकी आल्या तरी मी माझी भूमिका बदलणार नाही," असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं.
काय आहे धमकीच्या पत्रात : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आलं आहे. त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती या पत्रात आहे. या पत्रात म्हटलं आहे की, "साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबले आहेत. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची 50 लाखांची सुपारी घेतली आहे. या गुंडांपासून तुम्ही सावध राहा, ते 5 जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मिटिंग झाली आहे," असा मजकूर या पत्रात लिहिलेला आहे. यात काही वाहनांचे नंबर देखील देण्यात आले आहेत.
पोलीस बंदोबस्त वाढवला : मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या भुजबळ फार्म बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारलं जाईल, अशी माहिती पत्रात दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून छगन भुजबळांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.
हेही वाचा :