अमरावती Amravati News : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांसोबतच मोठ्या संख्येने गवळी समाज खूप काळापासून राहतो आहे. विशेष म्हणजे मेळघाटातील दुर्गम भागात शेतीसह गाय आणि म्हशींचं पालन हा गवळी बांधवांचा मुख्य व्यवसाय आहे. डिसेंबर जानेवारी महिन्यापासून मेळघाटातील नद्या, तलाव सुकत असल्यामुळं जनावरांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहत नाही. यामुळं गुरांना चारा आणि पाणी मिळावं यासाठी गवळी बांधव सहा महिन्यापर्यंत मेळघाटला रामराम ठोकून, जनावरांना चारापाणी मिळेल अशा मैदानी प्रदेशात उतरायला लागले आहेत.
गवळी बांधवांना असा करावा लागतो संघर्ष : मेळघाटात कोरकू ही प्रमुख जमात असून यासोबतच गोंड, भाराडी, मानकर या जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. कोरकू जमाती पाठोपाठ मेळघाटात गवळी समाजाची संख्या सर्वाधिक आहे. चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यातील सर्वच दुर्गम गावांमध्ये गवळी समाज अनेक काळापासून वसला आहे. मेळघाटात सुमारे 50 हजाराच्या आसपास गवळी समाजाची लोकसंख्या आहे. गाई, म्हशी पाळणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. व्याघ्र प्रकल्पाने मेळघाटच्या जंगलात जनावरांना चराईसाठी अतिशय जाचक अटी लावल्यामुळं मर्यादित क्षेत्रातच गवळी समाजाला आपली जनावरे चारावी लागतात. जून ते डिसेंबर महिन्यापर्यंत मेळघाटातील नदी, नाले, तलावांना पाणी राहते. डिसेंबर महिन्यात मेळघाटातून वाहणाऱ्या सुमारे 80 टक्के नद्या ह्या कोरड्या होतात. तलावांना देखील पाणी राहत नाही. घनदाट जंगलात पाळीव जनावरांना चरण्यासाठी नेण्यास तसेच खाण्यासाठी नेण्यास बंदी असल्यामुळं गवळी समाज बांधवांना आपल्या जनावरांच्या पालन पोषणासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. गत अनेक काळापासून गवळी समाज बांधव जानेवारी महिन्यात आपली जनावर घेऊन मेळघाटच्या बाहेर पडतात. ज्या ठिकाणी जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था होईल त्या ठिकाणी गवळी समाजाचा मुक्काम राहतो.
माणसांनाही प्यायला पाणी नाही : मेळघाटातील 80 ते 90 टक्के गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासायला सुरुवात होते. मार्च, एप्रिल, मे महिन्यात मेळघाटातील आदिवासी बांधव 20 ते 25 किलोमीटर पर्यंत पाण्यासाठी पायपीट करतात. अनेकदा दूषित पाण्याने देखील अनेक भागातील गरीब आदिवासी बांधव आपली तहान भागवतात अशी गंभीर परिस्थिती आहे. अनेक गावात नळ योजना आली असली तरी या नळांना पाणी पुरवणाऱ्या व्यवस्थेपर्यंतच पाणी पोहोचत नाही. चिखलदरा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या 14 गावांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आमापाठी धरण बांधून तयार आहे. मात्र या धरणातून गावांना पाणीपुरवठ्याची व्यवस्थाच नाही अशी परिस्थिती आहे. एकीकडं माणसांनाच पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना जनावरांचे मात्र मोठे हाल होतात.
अनेक कुटुंबांचे एकत्रित स्थलांतर : मेळघाटातील गवळी समाज बांधव शिक्षणाबाबत बऱ्यापैकी जागृत आहे. यामुळं गवळी समाजातील लहान मुलं परतवाडा अमरावती अशा विविध ठिकाणी वस्तीगृहांमध्ये राहून शिक्षण घेत आहेत. गवळी समाजातील प्रत्येक कुटुंबाकडे 15 ते 20 च्या संख्येत गायी- म्हशी आहेत. घरातील कर्त्या व्यक्तीसह सर्व महिला जनावरांचे पालन पोषण करणं, दूध काढणं, खवा तयार करणं आणि त्याची विक्री करणं या कामात व्यस्त असतात. मेळघाटात पाण्याची टंचाई भासताच अनेक गावातील कुटुंब हे एकत्रितपणे बाहेर स्थलांतर करतात. घरातील मुलं बाहेर शिकत असल्यामुळं ते या भटकंतीत हरपले जात नाहीत. मात्र प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांच्या शिक्षणात मात्र अडथळा निर्माण होतो.
मेळघाट बाहेर दुसऱ्यांच्या शेतांमध्ये राहुटी : जनावरांच्या चाऱ्या पाण्यासाठी मेळघाटातून बाहेर पडलेले गवळी समाज बांधव हे प्रामुख्याने परतवाडा, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार या तालुक्यातील राहुटी करून राहतात. जनावरांद्वारे शेणखत, गोमूत्र मिळत असल्यामुळे शेतकरी या गवळी बांधवांना जवळपास पेरणीपर्यंत आपल्या शेतात राहू देतात. अनेक ठिकाणी आपल्या शेतात जनावर बसावी यासाठी सदन शेतकरी गवळी बांधवांना पैसे देखील देतात.
हेही वाचा -